सिंधुदुर्गात उधाणाचा पुन्हा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

आचरा - समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर वाढल्याने त्याचा फटका पुन्हा तळाशील व तोंडवळी गावांना बसला आहे. तळाशील किनारी बंधारा नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूप होऊन समुद्राचे पाणी तळाशीलपासून अवघ्या २० फुटांवर राहिले आहे. येथील भागात जमिनीचा बराचसा भाग समुद्राने गिळंकृत केला आहे.

आचरा - समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर वाढल्याने त्याचा फटका पुन्हा तळाशील व तोंडवळी गावांना बसला आहे. तळाशील किनारी बंधारा नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूप होऊन समुद्राचे पाणी तळाशीलपासून अवघ्या २० फुटांवर राहिले आहे. येथील भागात जमिनीचा बराचसा भाग समुद्राने गिळंकृत केला आहे.

वेगाने येणाऱ्या उधाणाच्या लाटांच्या माऱ्यामुळे तळाशील किनाऱ्याची वेगाने धूप होत आहे. या किनाऱ्यालगतच असलेली सुरूची झाडे कोसळून पडत आहेत. मुख्य विद्युत वाहिनीचे पोलही धोकादायक बनले आहेत. कोचरेकर कॉलनीमधील विरेश
कोचरेकर यांच्या दुकानालाही धोका निर्माण झाला आहे. कोचरेकर कॉलनी भाग ते संजय जुवाटकर यांचे घर या ८०० मीटर भागात मागणी असूनही बंधारा न झाल्याने बंधाऱ्याविना असलेला भाग समुद्र गिळंकृत करत आहे. या किनारी असलेले एक दुकान, व शौचालय यांच्या काही फुटावर समुद्राचे पाणी आले आहे. असाच जोर राहिल्यास दुकान व शौचालय समुद्रात विलीन होण्याची भीती आहे.

तहसीलदार समीर घारे यांनी आज दुपारी तोंडवळी, तळाशील येथील किनारपट्टीची पाहणी केली. तळाशील येथे आठ वर्षांपूर्वी संरक्षक बंधारा बांधण्यात आला; मात्र ८०० मीटर व ६०० मीटर अशा दोन ठिकाणी बंधारा नसल्याने उधाणाच्यावेळी किनारपट्टीला धोका निर्माण होतो. त्यामुळे अपूर्ण बंधारा तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांचे शिष्टमंडळ उद्या (ता. १३) या प्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. काही ग्रामस्थ प्रतिनिधी मुंबई येथे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पतन व बंदर अधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित राहून या बंधाऱ्याचा प्रश्न मांडणार आहेत. 

अजून दोन दिवस समुद्र उधाणाची परिस्थिती कायम राहील. त्यानंतर नारळी पौर्णिमेला पुन्हा उधाणाचा जोर असेल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी माजी सरपंच जयहरी कोचरेकर, संजय केळुसकर, शेखर कोचरेकर, राजेंद्र कोचरेकर, वीरेश कोचरेकर, धर्मराज कोचरेकर आदी उपस्थित होते.

मासेमारीवर परिणाम
मासेमारी हंगाम एक ऑगस्टपासून सुरू झाला; मात्र गेले दोन दिवस समुद्र पुन्हा खवळल्याने त्याचा मासेमारीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. समुद्री लाटांचा वाढलेला जोर पाहता होड्या किनाऱ्यावरच आहेत.

निवडणुकीपासून आमदार, खासदार यांनी दिलेली बंधाऱ्याची आश्‍वासने फोल ठरली आहेत. वारंवार लक्ष वेधूनही राजकीय पदाधिकारी, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे आरोप ग्रामस्थ करत आहेत. हतबल तळाशिल ग्रामस्थ जीवावर आलेले संकट टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने उपायांची मागणी करणार आहे.
- संजय केळूसकर,
माजी सरपंच

Web Title: heavy rains affects Talshil and Todavali village in Sindhudurg