समुद्र खवळला, सिंधुदुर्गात महिलेचा मृत्यू

तुषार सावंत
Thursday, 15 October 2020

अचानक ओहोळाला पूर आल्याने कोंडये-तेलीवाडी (ता.कणकवली) येथील एक महिला वाहून गेली. आज सकाळी तिचा मृतदेह घटनास्थळापासून दोन किलोमिटरवर आढळून आला. 

कणकवली (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कमी असला तरी सावट मात्र कायम आहे. समुद्र प्रचंड खवळलेला आहे. आज अधून-मधून जोरदार सरी कोसळत होत्या. अचानक ओहोळाला पूर आल्याने कोंडये-तेलीवाडी (ता.कणकवली) येथील एक महिला वाहून गेली. आज सकाळी तिचा मृतदेह घटनास्थळापासून दोन किलोमिटरवर आढळून आला. 

जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस पडत होता. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ही स्थिती ओढवली होती. याचा जोर आज कमी होता; मात्र रात्री उशिरा पावसाने पुन्हा सुरूवात केली. कणकवली तालुक्‍यात काल सायंकाळी चार वाजल्यापासून ढगफुटीसदृश पावसाला सुरवात झाली. यात मयुरी मंगेश तेली (वय 35) ही महिला अचानक ओहोळाला आलेल्या पाण्यात वाहून गेली. त्या आपल्या मुलीला घेऊन गुरे चारण्यासाठी माळरानावर गेल्या होत्या.

सायंकाळी पाचच्या सुमारास त्या घरी परतत असताना घरालगतच्याच ओहोळाला अचानक पाणी आले. यात त्या वाहून जाऊ लागल्या. यावेळी तेथे असलेल्या त्यांच्या मुलीने आरडाओरडा केला. यात ग्रामस्थ येईपर्यंत त्या दूरवर वाहून गेल्या होत्या. यानंतर ग्रामस्थांनी तातडीने त्या परिसरात शोधमोहीम सुरू केली; मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. तसेच मुसळधार पाऊस सुरू असल्याने शोधमोहिमेला यश आले नाही. 

आज सकाळी मयुरी यांची शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. यात वाहून गेलेल्या घटनास्थळापासून दोन किलोमिटर अंतरावरील एका झाडीत अडकलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आर. जे. पवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष डॉ. प्रथमेश सावंत, लिपिक महादेव बाबर, तलाठी मारुती सलाम, मंडळ अधिकारी नीलिमा प्रभुदेसाई, उमेश मेस्त्री आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती. मयुरी तेली यांच्या पश्‍चात पती, मुलगी असा परिवार आहे. 

संपादन - राहुल पाटील

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains kill a woman in Sindhudurg