
चिपळूण: चिपळूण तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून, सलग तिसऱ्या दिवशीही वरुणराजाची कृपा कायम आहे. विंध्यवासिनीच्या डोंगरातून येणारे पावसाचे पाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात शिरल्यामुळे येथील कार्यालय मध्यरात्री जलमय झाले. बहुतांश धरणे तुडुंब भरली असून प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. रविवारी सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधारेमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले असून बाजारपेठेत शुकशुकाट होता.