esakal | श्रावणधारांचा अनुभव! प्रचंड वेगवान वारे, मच्छीमारी नौका बंदराकडे...
sakal

बोलून बातमी शोधा

High winds in Ratnagiri district

सोमवारी एक दिवस मुसळधार पाऊस झाला. दुसऱ्याच दिवशी जोर ओसरला आणि कडकडीत ऊन पडले. बुधवारी सायंकाळपर्यंत तशीच परिस्थिती होती. जिल्ह्यात काही ठिकाणी श्रावणधारा सुरू होत्या.

श्रावणधारांचा अनुभव! प्रचंड वेगवान वारे, मच्छीमारी नौका बंदराकडे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - गेले दोन दिवस जिल्ह्यातील रहिवासी श्रावणधारांचा अनुभव घेताना दिसत आहेत. किनारी भागात वेगवान वारे वाहत असून, पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. बुधवारी (ता. 12) दुपारनंतर अचानक वारे वाहू लागल्याने समुद्राच्या पाण्याला प्रचंड करंट निर्माण झाल्याने मासेमारीसाठी गेलेल्या नौका सुरक्षितरीत्या बंदराकडे परतल्या आहेत. 

वाचा - आज परत सांगतो.. पार्थ लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा.

सोमवारी एक दिवस मुसळधार पाऊस झाला. दुसऱ्याच दिवशी जोर ओसरला आणि कडकडीत ऊन पडले. बुधवारी सायंकाळपर्यंत तशीच परिस्थिती होती. जिल्ह्यात काही ठिकाणी श्रावणधारा सुरू होत्या. विश्रांती घेत पाऊस पडत होता. रत्नागिरी तालुक्‍यात दुपारपर्यंत ऊन होते. दुपारनंतर अचानक वातावरण बदलले आणि ढग भरून आले. किनारपट्टी भागात वेगाने वारे वाहू लागले. सकाळच्या सत्रात शांत राहिलेला समुद्र दुपारनंतर खवळला होता. सायंकाळी हलका पाऊसही सुरू झाला होता. वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम मच्छीमारीवर झाला. 

हंगाम सुरू झाल्यानंतर वातावरणाचा रोख लक्षात घेऊन मच्छीमार 10 ते 15 वावात सुरक्षित राहून मासेमारी करत आहेत. चार दिवसांत शेकडो मच्छीमारी नौका समुद्रात जाऊ लागल्या आहेत. कोळंबी, पापलेटसह वेगवेगळ्या मासळीचे दहा ते पंधरा टप (एक टप 32 किलोचा) प्रत्येक बोटीला मिळतात. त्यात दोन ते तीन टप पापलेट मिळत आहेत. मासळीला पाहिजे तेवढा दर मिळत नसल्याने मच्छीमारांची अडचण झाली आहे. ना नफा ना तोटा अशी मासेमारी सध्या सुरू आहे. त्यातच दुपारनंतर वारे वाहू लागल्यामुळे वातावरण बदलले आणि समुद्रात गेलेल्या नौका किनाऱ्याकडे वळल्या. काहींनी जवळच्या बंदरावर आसरा घेतला आहे. मिरकरवाडा, जयगड, हर्णै, नाटे परिसरातील शेकडो नौका समुद्रात मासेमारीला ये-जा करत आहेत. 

हेही वाचा- तुम्हाला माहित आहे का? या गावाला तूळशी वृंदावनाचे गाव का म्हणतात?

दरम्यान, चिपळूण तालुक्‍यात तोडली येथील वसंत सखाराम पालकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 4 हजार 50 रुपयांचे नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्‍यात पडवे येथील मुरलीधर गजानन गडदे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 21 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्‍यात कोंड येथील राजेंद्र शांताराम माने यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 

चोवीस तासांत 38 मिमी पाऊस 
बुधवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी 38.96 मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 42.60 मिमी, दापोली 40.20 मिमी, खेड 43.50 मिमी, गुहागर 35.60 मिमी, चिपळूण 45.50 मिमी, संगमेश्वर 40.30 मिमी, रत्नागिरी 28.40 मिमी, राजापूर 30.60 मिमी, लांजा 43.90 मिमी पाऊस झाला. 1 जूनपासून आजपर्यंत 1,842 मिमी सरासरी पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 50 टक्‍के पाऊस झाला.

संपादन - राहुल पाटील

loading image