
बंडखोर साळवींची गोळपमधील मक्तेदारी मोडित काढू उदय सामंत;
रत्नागिरी : शिवसेनेमध्ये कोणताही नवा-जुना वाद नाही. राजकीय अस्तित्वासाठी भाजप हतबल झाल्यामुळे वाद उकरून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. शिवसेना तळागाळात रुजली आहे. त्यामुळे ज्यांना सेनेने अनेक पदे दिली. अनेकांनी त्यांच्यासाठी त्याग केला ते शिवसैनिक आता पेटून उठले आहेत. गोळप ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाविरोधात बंडखोरी करणार्या साळवींची येथील मक्तेदारी आम्ही मोडीत काढू, असा इशारा उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी दिला.
गोळप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल (ता.11) रात्री झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उद्योजक अण्णा सामंत, नगराध्यक्ष तथा तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य उदय बने, नंदकुमार मुरकर, विठ्ठल पावसकर, तालुका युवा अधिकारी तुषार साळवी, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, राकेश साळवी, बावा चव्हाण यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोळप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत पॅनेलविरोधात सेनेचे पंचायत समितीचे माजी सभापती मंगेश साळवी यांनी स्वत:चे पॅनेल उभे केले आहे. त्यामुळे ही निवडणूक सेनेने प्रतिष्ठेची केल्याने चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काल ही सभा झाली.
सामंत म्हणाले, माजी सभापती मंगेश साळवी यांची स्वत:च्या अस्तित्वासाठी गोळप गावात लढाई सुरू आहे. ग्रामपंयायतीमध्ये एवढं काय असतं, त्यांनाच माहित. पण आम्ही संस्कारक्षम आहोत. निवडणुका सुसंस्कृत पणे लढतो. त्यासाठी दोनवेळा त्यांना चर्चेला बोलावून बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता. रत्नागिरी, सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यात शिवसेनेची मोठी ताकद आहे. गोळप गाव गेले अनेक वर्ष शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभा आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या सोबतच गाव राहील, याची खात्री आहे.
हेही वाचा- विमानात संकटकाळात धावला ‘देवदूत’-
पंचायत समितीच्या गणाची किंवा जिल्हा परिषद गटाची निवडणूक असली तरी अनेकवेळा माझी शिवसैनिक साळवींच्या मागे उभा राहिला. त्याच्यासाठी संधीचा त्याग केला. तेच बंडखोरी करत असतील तर त्यांची गोळपमधील मक्तेदारी या निवडणुकीत नक्की मोडित काढू. गोळप ग्रामपंचायत निवडणुकीत 15 ही सदस्य विजयी होऊन शिवसेनेचा भगवा या ग्रामपंचायतीवर फडकणार याची मला खात्री आहे. 19 तारखेला ग्रामपंचायतीला विकासासाठी हवा तेवढा निधी देऊन तसा आराखडा तयार करा, अशा सूचनाही उदय सामंत यांनी केल्या.
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ
ज्यांना शिवसेनेने भरभरून दिले, तेच मंगेश साळवी कणकवलीचे समर्थन गोळपमध्ये घेऊन या निवडणुकीत दादागिरी करणार असतील, तर ते सहन केले जाणार नाही. आम्ही सुसंस्कारित आहोत. पण जशास तसे उत्तर देण्याची ताकद माझ्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये आहे. अंगावर आले तर शिंगावर घेऊन, असा इशाराही उदय सामंत यांनी दिला.
संपादन- अर्चना बनगे