रत्नागिरीतील "या'' तालूक्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस ; अनेक गावांचा संपर्क तुटला

सचिन माळी
Thursday, 6 August 2020

मुसळधार पावसाने तालुक्याला झोडपले असून जनजीवन विस्कळीत झाले.

मंडणगड : गेल्या तीन दिवसांपासून मंडणगड तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाच्या कटू आठवणी जाग्या करणारा वादळी पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाने तालुक्याला झोडपले असून जनजीवन विस्कळीत झाले. भारजा नदीला पूर आल्याने चिंचघर मांदिवली पूल दिसेनासा झाला. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

हेही वाचा कोरोनामुक्त मालवण शहरात अखेर कोरोनाचा शिरकाव...

चिंचघर, शेवरे परिसरातील शेकडो एकर भातशेती पाण्याखाली आहे. आजच्या दिवशी तालुक्यात तब्बल सरासरी २२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड २२८ मिमी, म्हाप्रळ १८० मिमी, देव्हारे २८० मिमी या तीन मोजणी केंद्रात एका दिवसांत एकूण ६८८ मिमी पाऊस झाला. आज सकाळपर्यँत एकुण २३९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पुरामुळे दरवर्षी पडीक क्षेत्रात वाढ

भारजा नदी पात्रात वर्षानुवर्षे साचलेला गाळ पुराला कारणीभूत ठरतो. समुद्राला भरती येत असल्याने खाडीचे पाणी पुराचा केंद्रबिंदू ठरलेल्या चिंचघर परिसराच्या दिशेने सरकते. लावणी केलेली भात शेती तीन दिवसांपासून पाण्याखाली असल्याने रोपे कुजण्याची शक्यता आहे.

शेताच्या बांधावरून पाणी गेल्याने अनेक बांध फुटून नुकसान झाले आहे. वाहत आलेला गाळ, कचरा यामुळे अनेक एकर जमीन नापीक बनत चालली असून दरवर्षीच्या अशा परिस्थितीमुळे पडीक क्षेत्र वाढत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

हेही वाचा  दरड कोसळली ; कोंकण रेल्वे मार्गावरील या पाच गाड्या मिरजमार्गे वळवल्या...

वर्षानुवर्षाचा गाळ काढून नदीचा प्रवाह मोकळा करणे आवश्यक

शेवरे, चिंचघर परिसरात पूरामुळे भारजा नदी पात्राबाहेर गेली. नदीचा प्रवाह संथ असल्याने वाहत आलेला गाळ नदीपात्रात अडकून बसतो. ही नदी बारमाही वाहत असल्याने गाळ या नदीपात्रातच साचतो. त्यामुळे पात्राची याची खोली बुजूली आहे. दरवर्षी पाण्याच्या तीव्रतेने फुटलेले बांध संरक्षित करणे गरजेचे आहे. जेणेकरुन येथील शेती क्षेत्र अबाधित राहिल

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: highest record of rain mandangad in ratnagiri