महामार्गावरील पूल डिसेंबरपर्यंत पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

कणकवली - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कशेडी ते झाराप या दरम्यान १२ पुलांचे काम सुरू आहे. यातील पिठढवळ वगळता उर्वरित पुलांची कामे जोड रस्त्याअभावी रखडली असून या पुलांच्या पूर्णत्वासाठी डिसेंबर २०१७ पर्यंतची डेडलाईन दिली आहे; तर अन्य पुलांची कामे येत्या पावसाळ्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती महामार्ग विभागाने दिली.

कणकवली - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कशेडी ते झाराप या दरम्यान १२ पुलांचे काम सुरू आहे. यातील पिठढवळ वगळता उर्वरित पुलांची कामे जोड रस्त्याअभावी रखडली असून या पुलांच्या पूर्णत्वासाठी डिसेंबर २०१७ पर्यंतची डेडलाईन दिली आहे; तर अन्य पुलांची कामे येत्या पावसाळ्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती महामार्ग विभागाने दिली.

महामार्ग चौपदरीकरणातील महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या पुलांची कामे सन २०१४ प्राधान्याने हाती घेतला. यानुसार खेड तालुक्‍यातील कशेडी ते सिंधुदुर्गपर्यत एकूण १४ मोठे पूल असून राजापूर येथील पूल वगळला आहे. उर्वरित १३ पुलांमध्ये कोळंबे वगळता जगबुडी, वाशिष्ठी नदीवर दोन तसेच शास्त्री, सप्तलिंगी, आंजणारी, वाकेड, खारेपाटण, जानवली, कसाल, रानबांबुळी आदी पुलांची कामे सुरू झालेली आहे. पिढढवळ नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले असून त्यावरून वाहतूक देखील सुरू झाली आहे. उर्वरित पुलांच्या पिलर आणि स्लॅबसह अन्य कामे अंतिम टप्प्यात आहेत. या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या जोडरस्त्यासाठी भूसंपादन, त्याबाबतचा जमीन मालकांना मोबदला आणि त्यानंतरची ताबा पावती झालेली नसल्याने पूल जोडता आलेले नाहीत. सद्यःस्थितीत जमीन मालकांना मोबदला वाटपाचे काम सुरू असून ताबा पावतीची प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही पूर्णत्वास जाणार आहे.

दरम्यान, पुलांच्या जोडरस्त्यांबरोबर वाळू आणि खडी उपलब्ध होत नसल्याची तक्रार काम कंपन्यांनी केली असून त्यानुसार मुदतवाढीची मागणी केली आहे. या कंपन्यांना सुरूवातीला दिलेली १८ महिन्यांची मुदत डिसेंबर १६मध्ये संपल्यानंतर पुन्हा जून १७ पर्यंत पहिली सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. मात्र या कालावधीतही जोडरस्त्यांचा प्रश्न न सुटल्याने आता पुन्हा डिसेंबर २०१७  दुसरी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

पूल जोडण्याबाबत कंपन्यांना लवकरच पत्र
सध्या महसूल विभागाकडून महामार्गबाधितांना मोबदला वाटप सुरू करण्यात आलेले असल्याने महिनाभरात जोडरस्त्यांचा विषय मार्गी लागेल आणि त्यानुसार कंपन्यांना पूल जोडण्याबाबत पत्र दिले जाईल, अशी माहिती महामार्ग विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

Web Title: The highway bridge completed by December