पावसाळ्यात यंदा महामार्ग खड्डेमुक्‍त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

सार्वजनिक बांधकाम - देखभालीची जबाबदारी कंपन्यांकडे; पावसानंतरही सुस्थितीत

रत्नागिरी - पावसाळ्यात गतवर्षीप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावले उचलली आहेत. चौपदरीकरणासाठी नेमलेल्या कंत्राटदारांकडेच ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर पुलांची दुरुस्तीही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चिपळूण, कुडाळमध्ये कामे सुरू आहेत. पाऊस पडल्यानंतर गणेशोत्सवात गतवर्षीप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाची बिकट अवस्था होणार नाही अशी काळजी घ्या, असे म्हटले आहे.

सार्वजनिक बांधकाम - देखभालीची जबाबदारी कंपन्यांकडे; पावसानंतरही सुस्थितीत

रत्नागिरी - पावसाळ्यात गतवर्षीप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावले उचलली आहेत. चौपदरीकरणासाठी नेमलेल्या कंत्राटदारांकडेच ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर पुलांची दुरुस्तीही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चिपळूण, कुडाळमध्ये कामे सुरू आहेत. पाऊस पडल्यानंतर गणेशोत्सवात गतवर्षीप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाची बिकट अवस्था होणार नाही अशी काळजी घ्या, असे म्हटले आहे.

गतवर्षी पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली होती. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावर्षी तशी परिस्थिती निर्माण होऊ नये,  यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावले उचलली आहेत. चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार कंपन्यांकडे चौपदरीकरणाची जबाबदारी दिली आहे. ते काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत महामार्गाच्या दुरुस्तीसह देखभाल त्या कंपन्यांकडूनच करून घ्यावयाची आहे. पावसाळ्यानंतर चौपदरीकरणाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. या चार महिन्यांत रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहावा अशा सूचना चेतक, एमईपी, केसीबी, दिलीप फर्म या चार कंपन्यांना लेखी स्वरूपात देण्यात आलेल्या आहेत. त्यादृष्टीने बांधकाम विभागही सज्ज झाला आहे. चिपळूण रेल्वे स्थानक आणि कुडाळ येथील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर महामार्गावरील खचलेले रस्ते, बुजलेली गटारे, नादुरुस्त मोऱ्या, पुलांची रेलिंग दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. 

आपत्कालीन स्थिती मदतीसाठी बांधकाम विभागाची पथके सहा ठिकाणी नियुक्‍त केली आहेत. घटना घडल्यानंतर एका तासाच्या आतमध्ये दरडग्रस्त जागेवर यंत्रणा पोचून वाहतुकीला होणारा अडथळा दूर होईल. या पथकामध्ये एक इंजिनिअर आणि कामगारांचा समावेश असेल. मुंबई-गोवा महामार्गाबरोबरच रत्नागिरी-कोल्हापूर विभाग पावसाळ्याला तोंड देण्यास सज्ज आहे. आतापर्यंत चार कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. यावर्षी या मार्गावर खड्डे पडणार नाहीत, अशी कार्यवाही करण्यात आल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.

स्ट्रक्‍चरल ऑडिटचा दिलासा

सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी ‘ध्रुव’ कंपनीची नेमणूक केली होती. त्यानुसार गेल्या महिन्याभरामध्ये महामार्गावरील १८ मोठ्या पुलांसह एकूण ७० पुलांची तपासणी आधुनिक यंत्राद्वारे करण्यात आली. त्याचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही; परंतु पुलाला धोका असता तर तशी माहिती तत्काळ संबंधित यंत्रणेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली असती. पुलाच्या दुरुस्तीसंदर्भात उपाययोजना करणे शक्‍य झाले असते. अजून संबंधित कंत्राटदाराकडून तशा सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल मागविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी ८ मे रोजी झालेल्या आपत्कालीन स्थितीच्या आढावा बैठकीत दिली आहे. त्यानुसार बांधकाम विभागानेही ध्रुव कंपनीला पत्र पाठविले आहे.

वाशिष्ठी पुलाबाबत निर्वाळा
वाशिष्ठी (चिपळूण) नदीवरील पुलाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा बांधकाम विभागाकडून देण्यात आला आहे. तेथील नागरिकांकडून तक्रारी आल्यानंतर कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात पुलाला पावसाळ्यात कोणताही धोका पोचणार नाही, असा निर्वाळा बांधकामकडून देण्यात आला आहे.

Web Title: highway patch-free in this rain