बारावीच्या परीक्षेला विद्यार्थी हसतमुखाने सामोरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

रत्नागिरी - बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून (२८ फेब्रुवारी) सर्वत्र प्रारंभ झाला. कोकण विभागीय मंडळात ३२ हजार ७४३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. आज इंग्रजीचा पेपर झाला व अनेक केंद्रांवर विद्यार्थी हसतमुखाने परीक्षेला सामोरे जाताना पाहायला मिळाले. अनेक पालक, मोठे भाऊ-बहीण विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आज सकाळी केंद्रावर पोचले होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यात २८ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहे. कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी आठ भरारी पथकांची स्थापना केली आहे. त्यामध्ये महिलांच्या एका विशेष भरारी पथकाचा समावेश आहे. भरारी पथकाचे नेतृत्व माध्यमिक, प्राथमिक शिक्षणाधिकारी, डाएटचे प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी करीत आहेत.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५९ परीक्षा केंद्रातून ३२ हजार ७४३ विद्यार्थी बसले आहेत. विज्ञान शाखेचे ८ हजार ३४०, कला शाखेतून ९ हजार ५१४, वाणिज्य शाखेतून १२ हजार १४९, तर एमसीव्हीसी शाखेतून १ हजार ७४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

यापूर्वी मंडळातर्फे तणावमुक्‍त, कॉपीमुक्‍त परीक्षेसाठी महाविद्यालयातून जनजागृती अभियान राबविण्यात आले आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व पालकांचे मेळाव्यात सूचना दिल्या आहेत. काही केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे विद्यार्थ्यांवर वॉच ठेवला जाणार आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना वेळेत प्रश्‍नपत्रिका उपलब्ध होण्यासाठी आवश्‍यक ते नियोजन मंडळामार्फत करण्यात आले आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

वर्षभर घरातील वातावरण आनंदी ठेवले. कोणताही ताण न येता व मुलग्याला अभ्यासाची सक्ती केली नाही. खेळ, टीव्हीवरील आवडीचे कार्यक्रमही पाहायला दिले. कॉलेज व जादा क्‍लासमधील अभ्यासावर भर दिला.
- भारती खेडेकर, पालक

इंग्रजीच्या व्याकरणाचा जास्त अभ्यास केला. शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करण्यापेक्षा आनंदी वातावरणात परीक्षेला सामोरे जात आहे. १० मार्चनंतर परीक्षा संपणार आहे.
- महेश सागवेकर, परीक्षार्थी

Web Title: HSC exam start