शिरवल धरणातून शेकडो टन वाळू चोरीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

कळणे - शिरवल धरण क्षेत्रातून सध्या शेकडो टन वाळू चोरीला जात आहे. लघुपाटबंधारे विभाग याकडे डोळेझाक करत आहे. या भागात नव्याने झालेला रस्ता वाळू वाहतुकीसाठी वापरला जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

कळणे - शिरवल धरण क्षेत्रातून सध्या शेकडो टन वाळू चोरीला जात आहे. लघुपाटबंधारे विभाग याकडे डोळेझाक करत आहे. या भागात नव्याने झालेला रस्ता वाळू वाहतुकीसाठी वापरला जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

शिरवल-कुंब्रल परिसराला हे धरण कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरत आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी याचे बांधकाम झाले. डोंगराळ भागात असलेल्या या धरणापर्यंत जायला पूर्वी पक्का रस्ता नव्हता. या धरणात सह्याद्रीच्या रांगामधून पाणी येते. या भागातून दर्जेदार वाळूही धरण क्षेत्रात वाहून आणली जाते. साधारण एप्रिलपासून धरणाचा पाणीसाठा कमी व्हायला लागतो. यानंतर हे रेतीक्षेत्र उघडे पडते. इतकी वर्षे इथपर्यंत पोहोचायला पक्का रस्ता नसल्याने वाळू काढली जात नसे. दोन वर्षांपासून शिरवलमार्गे केर रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता धरणाच्या अगदी जवळून जातो. त्यामुळे धरण क्षेत्रापर्यंत जायला पक्का रस्ता उपलब्ध झाला आहे. वाळू चोरीसाठी याचाच वापर सुरू झाला आहे.

गेला आठवडाभर रात्रीच्या वेळी जेसीबी आणि डंपर थेट धरणक्षेत्रात घुसवले जात आहेत. रोज हा प्रकार सुरू आहे. आतापर्यंत शेकडो टन वाळू डंपरमध्ये भरून येथून बाहेर काढण्यात आली आहे. यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याची स्थिती आहे. वाळू वाहतुकीतून महसूलचेही नुकसान होत आहे. शिवाय वाळू कशीही ओरबडली जात असल्याने धरणाच्या रचनेलाही धोका पोहोचण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे. अशा पद्धतीने कोणीही येऊन वाळू नेत असेल तर भविष्यात याचा धरणाच्या सुरक्षेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. लघुपाटबंधारे विभाग याबाबत अनभिज्ञ आहे.

सध्या धरणाच्या क्षेत्रात ठिकठिकाणी वाळू जेसीबीच्या मदतीने खोदल्याच्या खुणा दिसतात. डंपरच्या चाकांच्या खुणा कोरड्या पडलेल्या पूर्ण धरण क्षेत्रात पसरल्या आहेत. रात्री आठनंतर सुरू होणारी ही वाळू चोरी पहाटेपर्यंत चालते. यात कोणाचा सहभाग आहे याबाबत स्थानिक अनभिज्ञ आहेत. या सगळ्याची चौकशी करून चोरटी वाहतूक तातडीने थांबवावी अशी मागणी ग्रामस्थांतर्फे केली जात आहे.

दामदुप्पट नफा
या धरणात सह्याद्रीच्या रांगामधून पाणी येते. याच्या मार्गात मोठमोठे खडक आहेत. याची झीज होऊन त्यापासूनची वाळू पाण्याच्या वेगाबरोबर धरणात जमा होते. ही वाळू खाडीतून मिळणाऱ्या वाळूच्या तुलनेत दर्जेदार मानली जाते. सध्या या भागात मोठ्या प्रमाणात वाळू आणायची असेल तर पन्नास ते सत्तर किलोमीटर अंतरावरून खाडीची वाळू आणावी लागते. या तुलनेत धरणातील ही वाळू दर्जेदार आणि कमी वाहतूक खर्चात टाकणे शक्‍य असल्याने चोरटी वाहतूक करणाऱ्या एजंटांना यातून भरमसाट नफा मिळू शकतो. साहजिकच रात्री जागवून वाळूचा उपसा केला जात आहे.

गेला आठवडाभर शिरवल धरणातून रात्रीच्या वेळी वाळूची चोरी होत आहे. हा प्रकार गंभीर आहे. रात्रीच्या वेळी जेसीबी आणि डंपर घुसवून पहाटेपर्यंत डंपरने वाळू खाली आणली जाते. ही वाळू चोरी त्वरित थांबण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलावीत. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी.
- संदीप लाडू नाईक, शिरवल ग्रामस्थ

Web Title: Hundreds of sand steals from Shirwal dam