
केंद्रातील सरकार, भाजप आणि संघ परिवारातील संघटना शेतकर्यांच्या आंदोलनामुळे पूर्णत तोंडघशी पडले आहे
चिपळूण - राज्यात भाजपला बाजूला करून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी होणार असे पहिले भाकित मी केले होते असा गौप्यस्फोट माजी खासदार काँग्रेसचे प्रवक्ते हुसैन दलवाई यांनी आज चिपळूणला केला.
दलवाई दोन दिवस चिपळूणच्या दौर्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्यानंतर भाजप मित्र पक्षाला बरोबर घेवून सत्तेत येणार अशा प्रकारच्या वावड्या उठल्या होत्या. त्यावेळी मी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून म्हणालो होतो की भाजप सत्तेत येणार नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राज्यात सरकार येणार. शिवसेनेबरोबर सत्तेत बसण्यासाठी मी काँग्रेस हायकमांडबरोबर चर्चा केली होती. सत्ता स्थापन करण्याच्या काळात रात्री पहाटे जे नाट्य घडत होते त्यावर माझे बारकाईने लक्ष होते. मुस्लीम समाजाने शिवसेनेबरोबर यावे यासाठी मी मुस्लीम समाजातील नेत्यांचे प्रबोधन केले होते. त्यावेळी देशभरातून माझे कौतूक आणि अभिनंदन झाल्याचे दलवाई यांनी सांगितले.
ते म्हणाले, केंद्रातील सरकार, भाजप आणि संघ परिवारातील संघटना शेतकर्यांच्या आंदोलनामुळे पूर्णत तोंडघशी पडले आहे. आंदोलनात फूट पाडण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न पूर्णतः निष्फळ ठरले आहेत. जागतिक मंदीच्या काळात भारताची अर्थव्यवस्था थोडीफार घसरली. मात्र घसरलेल्या अर्थव्यवस्थेचा सामान्य कुटूंबाला त्रास होणार नाही याची काळजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतली होती. देशातील पंडित नेहरूंपासून निर्माण झालेली आर्थिक घडी मोदींनी विस्कटून टाकली आहे. अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे सोडा 7.5 टक्क्यावर घसरली आहे. नवीन उद्योग येत नाही. कोट्यवधी तरूण बेरोजगार होत आहेत. केंद्र सरकार आणि भाजप विरोधी समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. या सगळ्या प्रश्नातून जनतेचे वेगळ्या प्रश्नांकडे लक्ष नेण्यासाठी अतिशय घातक प्रश्न निर्माण केले जात आहे. देशातील अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य केले जात आहे. भाजपसारख्या फॅसिस्ट शक्तीला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी आघाडी निर्माण करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम मीच मांडला होता. ही महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर ठरली आहे. ती व्यवस्थित चालू आहे. अशावेळी सत्तेबाहेर फेकले गेलेले मतदार आणि महाविकास आघाडीत फुट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपच्या सत्ता काळात मुस्लीम, दलित आणि ख्रिश्चनच्या विरोधात सांस्कृतिक धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. सांस्कृतिक प्रतीके संपवली जात आहेत. यातून देशाची सांस्कृतिक विविधता नष्ट केली जात आहे. मुस्लीम समाजावर सांस्कृतिक उपरेपणा लाजला जात आहे. हा प्रकरा निषेधार्ह आहे.
हे पण वाचा - भन्नाटच : मतदान केले तरच मिळणार चिकन-मटन
संपादन - धनाजी सुर्वे