Guhagar : घरात घुसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्या

घरात घुसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी

गुहागर : चिपळूण तालुक्यातील पाते पिलवली गव्हाणवाडी येथे रात्री बिबट्या घरात घुसला. त्याच्या उडीचा आवाज ऐकून घरातील महिला जागी झाली. तिने दिवे लावताच बिबट्याची आणि तिची नजरानजर झाली. बिबट्याने पती-पत्नीला पंजा मारून घाबरवले आणि तो स्वयंपाकघरात लपला. यामुळे मुलाला घेऊन पती-पत्नी घरातून बाहेर पडले. ही थरारक घटना गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. सकाळी माळ्यावर लपलेला बिबट्या सर्वांना गुंगारा देत क्षणार्धात जंगलात नाहीसा झाला.

पाते पिलवली गव्हाणवाडीत कोंबड्या फस्त करण्यासाठी तीन वर्षांचा बिबट्या तुकाराम गंगाराम सुवरे (वय ५०) यांच्या घराजवळ आला. घर एका बाजूने उघडे आहे. कोंबड्यांच्या शोधात बिबट्याने घरात उडी मारली. धपकन् काय पडले, हे पाहण्यासाठी सुनीता तुकाराम सुवरे (४५) यांनी माजघरातला लाईट लावला. तेव्हा बिबट्याची आणि त्यांची नजरानजर झाली. बिबट्या सुनीता यांना पंजा मारून स्वयंपाकघरात पळाला;

तिथून बाहेर पडण्यासाठी जागा नव्हती. तो पुन्हा माजघरात संदुकीवर येऊन बसला. सुनीताने मुलाला उठवले. पुन्हा हालचाल झालेली लक्षात येताच बिबट्या तिथल्या कॉटखाली जाऊन लपला. त्याच कॉटवर सुनीता यांचे पती तुकाराम झोपले होते. त्यांना काहीच कळले नव्हते. कॉटखाली बिबट्या गेल्यावर सुनीताने तुकारामना उठवले. कॉट हलल्याने घाबरलेल्या बिबट्याने तुकारामच्या डोक्यात पंजा मारून पुन्हा स्वयंपाक घरात पळ काढला. ग्रामस्थांनी जखमी पती-पत्नीला डेरवण येथील रुग्णालयात नेले. दोघांची प्रकृती उत्तम असल्याचे परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर यांनी सांगितले आहे.

आणि बिबट्या पसार

सकाळी वनविभागाचे पथक दाखल झाले. वनरक्षकांनी बिबट्याचा घरात शोध घेतला. त्या वेळी तो माळ्यावर बसल्याचे लक्षात आले. घराचे दोन्ही दरवाजे आणि खिडक्या उघडून बिबट्याला बाहेर कसे काढायचे, याची चर्चा उपस्थित करत होते. तितक्यात बिबट्याने माळ्यावरून खाली उडीत मारत, मागील दाराने जंगलात पळ काढला.

loading image
go to top