ओटवणेत मोटारीतून दारूसाठा जप्त 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने मोटारीतून बेकायदा नेण्यात येणाऱ्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई करून एकूण 5 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बांदा ( सिंधुदुर्ग ) - गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने मोटारीतून बेकायदा नेण्यात येणाऱ्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई करून एकूण 5 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने बांदा - दाणोली रस्त्यावर ओटवणे येथे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास केली. 

याप्रकरणी नितीन शशिकांत पोकळे (46, रा. करवीर, जि. कोल्हापूर) व विशाल रवींद्र वनकुंद्रे (47, रा. शाहूपुरी, जि. कोल्हापूर) या संशयिताना ताब्यात घेण्यात आले. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने मोटारीतून गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार अबकारी खात्याचे जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. एच. चव्हाण, सहाय्यक दुय्यम निरीक्षक चंद्रकांत कदम, जवान रमेश चंदुरे, शरद साळुंखे, संदीप कदम यांच्या पथकाने बांदा - दाणोली मार्गावर ओटवणे फाटा येथे सापळा रचला. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बांद्याहुन आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या फियाट मोटारीला (एमएच 09 डीएक्‍स 3275) तपासणीसाठी थांबविण्यात आले.

मोटारीची तसापणी केली असता मागील डिकीत व सीटवर गोवा बनावटीच्या दारूचे विविध ब्रॅंडचे खोके विनापरवाना आढळून आले. पथकाने 1 लाख 14 हजार रुपये किमतीची दारू व 4 लाख रुपये किमतीची मोटार असा एकूण 5 लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नितीन शशिकांत पोकळे (वय 46, रा. करवीर, जि. कोल्हापूर) व विशाल रवींद्र वनकुंद्रे (वय 47, रा. शाहूपुरी, जि. कोल्हापूर) या संशयिताना ताब्यात घेण्यात आले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illigal Wine Transport Seized In Otavae Sindhudurg Marathi News