गणरायाला भावपूर्ण निरोप ; सिंधुदुर्गमध्ये तब्बल एवढ्या हजार मूर्तींचे विसर्जन 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

जिल्ह्यात यावर्षी 68 हजार 68 घरगुती, तर 32 सार्वजनिक मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती.

ओरोस - गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात मंगळवार (ता.1) जिल्ह्यातील अकरा दिवसांच्या गणरायास भक्तिभावाने निरोप देण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील 15 हजार 328 घरगुती, तर 11 सार्वजनिक मूर्तींचे अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यात आले. 

जिल्ह्यात यावर्षी 68 हजार 68 घरगुती, तर 32 सार्वजनिक मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. गेले अकरा दिवस आरती आणि भजनांमुळे वातावरण भक्तिमय होते. बालगोपाळांचा उत्साह ओसंडून वाहत होता. गणपती बाप्पांच्या आराधनेत भक्तमंडळी तल्लीन होती. बाप्पांसाठी उकडीचे मोदक आणि करंज्यांचा नैवेद्य दाखवित, सुखकर्ता दु:खहर्ताचे सूर आळवित गणेशभक्तांनी आपले त्याच्याशी असलेले नाते अधिकच घट्ट केले. जिल्ह्यातील 11 दिवसांच्या गणपतींची विधीवत पूजा, आरती करून व नैवेद्य दाखवून ओहोळ, तलाव, नदी, समुद्रात विसर्जनास सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत तलाव, नद्या आणि गणेश घाटांवर सामाजिक अंतर ठेवून आणि कोरोनाबाबतची सर्व खबरदारी घेत भाविक सहभागी होते. विसर्जन स्थळांवर जिल्हा पोलिस दलाने भक्तांच्या सुरक्षेकडे काटेकोरपणे लक्ष ठेवले होते. नदी, नाले, समुद्रकिनारे, तलाव आदी विसर्जनस्थळी गणरायाला यावर्षीसाठी अखेरचा निरोप देण्यासाठी असंख्य हात जोडलेले पाहावयास मिळाले. फटाके आणि ढोलताशांचे आवाज आसमंतात घुमत होता; मात्र दुसरीकडे बाप्पाप्रती असलेल्या भक्तीभावनेचा मनातला एक कोपरा हळवा झाला होता. 

हे पण वाचा Good News : आता ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर मिळणार कर्ज 

 गणेशोत्सव कालावधीत 32 सार्वजनिक ठिकाणी बाप्पा विराजमान झाले होते. त्यापैकी 11 ठिकाणच्या सार्वजनिक बाप्पाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. यात बांदा 1, वेंगुर्ले 1, कुडाळ 2, कणकवली 1, वैभववाडी 4 व देवगड 1, तर मालवण तालुक्‍यातील 1 सार्वजनिक गणपती मूर्तींचा समावेश आहे. अकरा दिवसांच्या 15 हजार 328 मूर्तींना भक्तिभावाने निरोप देण्यात आला. यात दोडामार्ग पोलिस ठाणे हद्दीतील 233, बांदा 290, वेंगुर्ले 594, कुडाळ 1456, सावंतवाडी 850, निवती 602, सिंधुदुर्गनगरी 365, मालवण 2175, आचरा 750, कणकवली 2100, देवगड 3200, विजयदुर्ग 1083, वैभववाडी 1630 गणरायांचा समावेश आहे. 

हे पण वाचा - धगधगती स्मशानभूमी ; चोवीस तासात तब्बल शंभर अंत्यसंस्कार

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immersion of 15 thousand Ganesha idols in sindhudurg