esakal | धगधगती स्मशानभूमी ; चोवीस तासात तब्बल शंभर अंत्यसंस्कार  
sakal

बोलून बातमी शोधा

One hundred funerals in twenty four hours kolhapur Panchganga Cemetery

स्मशानभूमीत सध्या शेणीचा तुटवडा जाणवत आहे, स्वयंसेवी संस्थाकडून शेणी दान होत आहेत.

धगधगती स्मशानभूमी ; चोवीस तासात तब्बल शंभर अंत्यसंस्कार  

sakal_logo
By
युवराज पाटील

कोल्हापूर - कोविडच्या संकटामुळे पंचगंगा स्मशानभूमी रात्र अन दिवसभर धगधगत असताना गेल्या चोवीस तासात तब्बल शंभर मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्याची धक्कादायक नोंद स्मशानभूमीतील कार्यालयात झाली आहे. वाढत्या संख्येमुळे सर्व 47 बेड वापरात असूनही ते हे आता अपुरे पडत असल्याचे सध्याचे चित्र आहे. 

सोमवारी (ता.31) दुपारी बारापासून ते काल दुुपारी बारापर्यंत आज (ता. 1) शंभर मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले. गेल्या चार ते पाच महिन्यात चोवीस तासात शंभर मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यात कोविडची लागण होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार पंचगंगा स्मशानभूमीतच होतात. गेल्या पाच महिन्यांचा विचार करता सुमारे अडीच हजार मृतदेहांवर आतापर्यंत अंत्यसंस्कार झाले आहेत. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी जीव घोक्‍यात घालून आपले काम सुरू ठेवले आहे. कोविडच्या मृतदेहांमुळे कितीवेळा पीपीई कीट घालायचे आणि कितावेळा काढायचे असा प्रश्‍न उभा राहिला आहे. 

सोमवारी दुपारी बारापासून मृतदेह येण्याचा वेग वाढत गेला. एका मृतदेहासाठी लाकूड आणि शेणी कर्मचारी रचतात न रचतात तोपर्यत दूसरा मृतदेह दारी अशी अवस्था झाली. स्मशानभूमीत चार शिफ्टमध्ये काम चालते. सोमवारी दुपारी. सायंकाळी तसेच रात्रभर मृतदेहांवर अंत्यसंस्कार सुरू होते. काल दुपारपर्यंत आकडा शंभराच्या घरात गेला आणि स्मशानभूमीतील रजिस्टरही नोंदीसाठी कमी पडू लागले. शहराबाहेरील मृतदेह (कोविड) असल्यास डॉक्‍टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र. संबंधिताचे आधारकार्ड बंधनकारक आहे. शंभर मृतदेहात कोविडच्या मृतदेहांची संख्या सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले. 

स्मशानभूमीत सध्या शेणीचा तुटवडा जाणवत आहे, स्वयंसेवी संस्थाकडून शेणी दान होत आहेत. मात्र मृतदेहांची संख्या वाढत असल्याने शेणीही कमी पडत आहेत. कोरोनाच्या काळात बेड कमी पडू नयेत यासाठी वीस बेड नव्याने करण्यात आले. केवळ सहा बेड अन्य मृतदेहांसाठी राखीव ठेवण्यात आले. उर्वरीत ठिकाणी कोविडच्या मृतदेहांवर अंत्यसंसकार झाले. कसबा बावडा, बापट कॅम्प तसेच कदमवाडी येथे मृतदेह पाठविण्याची वेळ आली, मध्यंतरी बेडची संख्या कमी पडू लागल्याने केवळ कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले गेले. गेल्या आठवड्यापासून बेड वापरात आले. सध्या 47 बेड वापरात आहेत. गॅस दाहिनीत दररोज किमान सहा ते सात मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. 
वाढत्या मृतदेहांमुळे कर्मचाऱ्यांवर कमालीचा ताण असून रजा. सुट्टी याचा विचार न करता केवळ काम आणि कामच या कर्मचाऱ्यांच्या वाट्याला आले आहे. 

अन्य मृतदेहांना जागा मिळावी यासाठी तारीख, वार न पाहता सहा तासानंतर अथवा दूसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन करावे असे आवाहन कार्यालयाने केले आहे. 

हे पण वाचा - Good News : आता ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर मिळणार कर्ज 

 
गेल्या चोवीस तासात शंभर मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. यात कोविडच्या मृतदेहांचा समावेश आहे. कर्मचारी खभरदारी घेऊन अंत्यसंस्कार पार पडतात. शेणी दान करण्याच्या आवाहनास प्रतिसाद मिळत आहे. मात्र अजूनही स्वयंसेवी संस्था, तसेच सामाजिक संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे. शेणी पुरेशा संख्येने उपल्बध झाल्या तरी अंत्यसंस्कारासाठी कोणतीही अडचण येणार नाही. 
- अरविंद कांबळे. आरोग्य निरीक्षक 

हे पण वाचाकोल्हापूरमध्ये एका दिवसात तब्बल पन्नास हजार वाहनांची एन्ट्री 

संपादन - धनाजी सुर्वे 

go to top