उत्पादन कमी असूनही ब्राझील, इस्राईलच्या काजूमुळे दरात घसरण

उत्पादन कमी असूनही ब्राझील, इस्राईलच्या काजूमुळे दरात घसरण

संगमेश्‍वर - गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी काजू बियांचे उत्पादन निम्म्याहून कमी असताना दर मात्र वाढीव मिळण्याऐवजी किलोला 110 रुपये एवढा दर घसरल्याने उत्पादक चांगलेच अडचणीत आले आहेत. ब्राझील आणि इस्राईलमधून काजू बियांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने कोकणात यावर्षी काजू बीचे उत्पादन घटूनही दर गडगडले असल्याचे दिसून येत आहे. 

गतवर्षी काजू उत्पादन उत्तम होते. तेव्हा बियांचा दर किलोला 155 रुपये होता. यंदा उत्पादन घटूनही हाच दर 110 वरच आहे. यावर्षी पडलेल्या थंडीचा फायदा काजूला झाला नाही, तर दुसऱ्या टप्प्यातही काजूचे उत्पादन झालेले नाही. यामुळे 113 रुपये असलेला दर आता 110 वरच आहे. 

संगमेश्वरात दरवर्षी शेकडो टन काजू बियांची खरेदी आपण करतो. गेल्यावर्षी शेवटपर्यंत 155 चा दर कायम होता. मोठ्या काजू फॅक्‍टरी चालकांना आम्ही 3 ते 4 रुपये फरकानेही सर्व काजू बी विकली होती. मात्र खरेदी अधिक दराने झाल्याने काजूगर उत्पादकांना अपेक्षित नफा झाला नाही. परिणामी या वर्षी त्यांनी ब्राझिल आणि इस्राईल येथून आयात झालेली काजू बी मोठ्या प्रमाणावर खरेदी करून ठेवल्याने कोकणातील काजू बियांना असणारी मागणी घटली आणि हा दर किलोला 110 रुपये एवढा खाली येऊन अद्याप स्थिर राहिला, असे काजू बी खरेदीवाले राम विलास पासवान यांनी सांगितले. 

काजू बियांच्या उत्पन्नातून आपण तसेच कोकणातील बहुतांशी छोटे काजू उत्पादक आपल्या संसाराचे गणित मांडत असतात. गतवर्षी किलोला 155 एवढा विक्रमी दर मिळाल्यानंतर या वर्षी उत्पादन कमी असतांना काजू बी 110 रुपये एवढ्या कमी दराने विकावी लागत असल्याने छोट्या काजू उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. 

- रवींद्र हळबे, काजू उत्पादक 

गावोगावी फिरून काजू बी खरेदी करण्याचा आपला व्यवसाय असून गत आठवड्यात आपण पाच टन काजू बी 110 रुपये दराने खरेदी केली होती. गत आठवड्यात काजू बियांचा दर 113 होता त्यामुळे आपण ग्रामीण भागातून 110 रुपये दराने खरेदी केलेली बी आपण मोठ्या व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी घेऊन गेलो असता आपल्याला दर घसरल्याने खरेदी एवढाच 110 रुपये दर मिळाल्याने यावर्षी हा व्यवसाय थांबवला. 

- लक्ष्मण पवार, खरेदीदार 
 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com