वीस दिवसांत कोरोनाबाधितांमध्ये 11 टक्क्यांनी वाढ; कुठल्या जिल्ह्यात आहे हे चित्र...वाचा 

विनोद दळवी
Tuesday, 11 August 2020

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26 मार्चपासून कोरोना रुग्ण संख्या वाढ कासवगतीने पुढे जात होता.

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 20 दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली आहे. संख्या पाचशे पार गेली आहे. आता नव्याने मिळणाऱ्या रुग्णांमध्ये स्थानिकांचा भरणा असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

21 जुलै ते 9 ऑगस्ट या 20 दिवसांत तब्बल दोन हजार 910 कोरोना चाचणी नमुने घेण्यात आले आहेत. यात 237 रुग्ण मिळाले आहेत. या कालावधीत आणखी 101 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत तपासणीसाठी घेतलेल्या एकूण नमुन्यांच्या 12.27 टक्के नमुने बाधित आहेत. पहिल्या 117 दिवसांत हाच आकडा केवळ दीड टक्के होता. म्हणजे यात जवळपास 11 टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्या 117 दिवसांत दिवसाला रुग्ण मिळण्याची संख्या नियमित दहाच्या खाली होती. दोन ते तीन दिवस ही संख्या 20 च्या जवळपास होती. एकदाच 22 झाली होती; मात्र गेल्या वीस दिवसांत हा आकडा बहुतांश दिवस 10 च्या पुढे राहिला. 20 च्या पुढेही गेला. 9 ऑगस्टला तब्बल 34 रुग्ण मिळाले आहेत. 

जिल्ह्यात 26 मार्चपासून कोरोना रुग्ण संख्या वाढ कासवगतीने पुढे जात होता. त्याने 21 जुलैनंतर सशाची धावगती पकडली आहे. 20 जुलैपर्यंतच्या पहिल्या 117 दिवसांत 279 रुग्ण आढळले होते. त्यानंतर 9 ऑगस्टपर्यंतच्या अवघ्या 20 दिवसांत तब्बल 237 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्याच्या बाधित आकड्याने 500 चा टप्पा पार केला. एकूण 137 दिवसांत 7 हजार 578 चाचण्या घेण्यात आल्या. यातील 516 अहवाल बाधित आले. बाधितांपैकी 342 व्यक्ती कोरोनामुक्त होउन घरी परतल्या आहेत, तर 7 व्यक्तींचे निधन झाले आहे. सहाव्या मृत्यूनंतर तब्बल 36 दिवसांनी सातव्या व्यक्तीचे निधन झाले आहे. 

जिल्ह्यात पहिला रुग्ण 26 मार्चला मिळाला. यानंतर 29 एप्रिलला दुसरा रुग्ण मिळाला. मेमध्ये संख्येत वाढ होत गेली. ती 20 जुलैपर्यंत 279 झाली. या कालावधीत जिल्ह्यात 4 हजार 668 नमुने तपासले होते, तर 241 रुग्ण बरे होउन घरी परतले होते. पाच व्यक्तीचे निधन झाले होते. 26 मार्च ते 20 जुलै या 117 दिवसांत एकूण चाचण्यांमध्ये मिळालेली रुग्णसंख्या 1.6 टक्के एवढी होती. 

संक्रमणाचे अस्पष्ट होत जाणारे धागेदोरे 
पहिल्या 117 दिवसांत बाधित व्यक्तीचे संक्रमण जिल्ह्याबाहेरील होते किंवा त्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संक्रमण होत होते; मात्र मागील 20 दिवसांत ही स्थिती बदलली आहे. परजिल्ह्यातील व्यक्तीचा समावेश आहे; पण त्यापेक्षा स्थानिक बाधित होण्याची संख्या जास्त आहे. अनेक स्थानिक बाधितांना संक्रमण कोणामुळे झाले, याचा शोध लवकर लागत नाही किंवा काही रुग्णांमध्ये ते समजतही नसल्याचे चित्र आहे. 

धोका वाढण्याची भीती 
जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी चाकरमानी यायला लागले आहेत. हे चाकरमानी मुंबई, पुणे, ठाणेसारख्या कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या भागातून येत आहेत. त्यामुळे चाचणी संख्या आणि रुग्ण संख्या झपाट्याने वाढण्याचा धोका संभवत आहे. 

संपादन ः विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An increase of 11 percent in coronary arteries in twenty days; In which district is this picture ... read