पोल्ट्रीचालकांना मिळणार वाढीव दर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

सावंतवाडी - पक्ष्यांचे संगोपन करणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना आता महिन्याकाठी दहा ते बारा हजार रुपये जास्तीचे मिळणार आहेत. त्यांना रोजगार मिळवून देणाऱ्या गोवा येथील रॉयल चिकन कंपनीने प्रत्येक किलोमागे एक रुपया वाढवून देण्याचे मान्य केले आहे. या प्रश्‍नाबाबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी पाठपुरावा केला होता. यामुळे याचा लाभ जिल्ह्यातील दहा हजारांहून अधिक पोल्ट्रीचालकांना होणार आहे, असा दावा युवक कॉंग्रेसचे लोकसभा खजिनदार विशाल परब यांनी येथे केला. 

श्री. परब यांनी काल (ता. 25) सायंकाळी उशिरा येथील माजी खासदार नीलेश राणे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी तालुकाध्यक्ष संजू परब, पंचायत समिती सभापती रवी मडगावकर, सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते. या वेळी श्री. परब म्हणाले, ""जिल्ह्यात आणि विशेषत: माणगाव खोऱ्यात बॉयलर कोंबड्याची पिले संगोपन करणाऱ्या पोल्ट्रीचालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गोव्यातील रॉयल चिकन या कंपनीकडून त्यांना पिले तसेच त्यांना लागणारे खाद्य, औषधे दिली जातात. त्याच्या बदल्यात ती पिले वाढवून दिल्यानंतर प्रत्येक किलोमागे पाच रुपये दिले जातात; मात्र ही सर्व प्रक्रिया किचकट आणि वेळकाढू असल्यामुळे या रकमेत वाढ करून देण्यात यावी, अशी मागणी संबंधित व्यावसायिकांच्यावतीने माजी मुख्यमंत्री राणे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी हा प्रश्‍न नीलेश राणे यांना सोडविण्यासाठी सांगितला होता. त्यानुसार श्री. राणे यांनी लक्ष घालून संबंधित कंपनीशी चर्चा केल्यानंतर संबंधित कामगारांना आता न्याय मिळाला आहे. प्रत्येक पोल्ट्री व्यावसायिक महिन्याला दहा हजार किलो कोंबड्या तयार करून कंपनीला देत असतो. या नव्या निर्णयामुळे आता दर महिन्याला त्या पोल्ट्रीचालकांच्या खिशात दहा ते पंधरा हजारांची भर पडली आहे. 

श्री. राणे यांनी हा प्रश्‍न सोडविल्यानंतर एकत्र आल्यानंतर न्याय मिळू शकतो, असे संबंधित व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी आता एकत्र येऊन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत माजी खासदार नीलेश राणे यांच्या नावाने ही संघटना स्थापन करण्यात येणार आहे आणि संघटनेच्या माध्यमातून व्यावसायिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.'' 

विशाल परब यांचा पुढाकार 
पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रश्‍न गेले अनेक दिवस रेंगाळलेले होते. त्यांना कोणीही वाली नसल्यामुळे त्यांच्या प्रश्‍नाकडे कोणीही लक्ष देत नव्हता. श्री. परब यांनी पुढाकार घेऊन राणेंच्या कानावर हा विषय घातल्यानंतर या प्रश्‍नाला वाचा फुटण्यास मदत झाली. त्यामुळे सर्व व्यावसायिकांच्यावतीने श्री. परब यांचे आभार मानण्यात आले. 

Web Title: Increased rate for poultry operators