पूराचा औद्योगिक क्षेत्रावर परिणाम; उत्पादन ठप्प

सुनील पाटकर
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

- महाड शहर आणि तालुक्यामध्ये नुकत्याच आलेल्या महापुराचा फटका महाड औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसला आहे. 

- औद्योगिक क्षेत्रांमधील कंपन्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

- अनेक कारखान्यांचे या महापुरामुळे उत्पादनही बंद पडले आहे.

महाड : महाड शहर आणि तालुक्यामध्ये नुकत्याच आलेल्या महापुराचा फटका महाड औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसला आहे. औद्योगिक क्षेत्रांमधील कंपन्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक कारखान्यांचे या महापुरामुळे उत्पादनही बंद पडले आहे. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने कारखानदार आणि कामगार वर्ग चिंतेत पडला आहे.

महाड औद्योगिक क्षेत्र हे पुराच्या पाण्यापासून सुरक्षित असे ठिकाण मानले जाते. याठिकाणी 2005 ला आलेल्या महापुरानंतर यावेळी आलेल्या महापुराची पातळी मोठी होती. औद्योगिक क्षेत्रांमध्ये तब्बल सहा ते आठ फुटांपर्यंत अनेक कारखान्यांमध्ये पुराचे पाणी होते. लक्ष्मी आँरगँनिक या कारखान्याच्या आवारामध्ये तब्बल आठ फूट एवढे पुराचे पाणी होते. औद्योगिक क्षेत्रांमध्ये कांबळे फाटा, जीते परिसर, आसनपोई येथून काळ नदीचे आलेले असे सर्व भागातून येणारे पाणी एकत्र झाल्याने महाड शहरा इतकेच पाणी ह्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये पसरले.

यामुळे औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. वीज पुरवठा खंडित झाल्याने औद्योगिक क्षेत्रातील उत्पादने ठप्प झाली. या पाण्याचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये लहान उद्योजकांना बसलेला आहे. लहान उद्योजकांनी आपले कारखाने कर्ज काढून सुरु केलेले आहेत. या आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानातून पुन्हा कसे उभे राहायचे हा प्रश्न कारखानदारांना भेडसावत आहे. तब्बल 40 कारखानांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. लक्ष्मी आँरगँनिक, पर्ल पोलिमर, ल्हासा, केमिकल, प्रिव्हि आँरगँनिक , मल्लक, ड्युफ्लाँन, टायटन, महाड फ्लोरिंग, बायो इंडिया, मार्क्स केमिकल, हायकल,एजिज ग्लोबल, टाईमॅक्स टेक्नोप्लास्ट अशा अनेक कंपन्यांना पुराचा फटका बसला आहे.

कंपनीच्या आवारामध्ये आणि प्लाॅट मध्ये पाणी शिरल्याने कंपनीची यंत्रसामग्री नादुरुस्त झाली आहेत. मोटार्स, बॉयलर, पॅनल बोर्ड तसेच प्रयोग शाळेतील विविध प्रकारची उपकरणे नादुरुस्त झाली आहेत. कच्चा माल, पावडरच्या पोती भिजून गेल्या आहेत. हायकल, एजिज ग्लोबल, डाईम आँरगँनिक कंपनीच्या भिंती पडल्या आहेत. टाईमॅक्स टेक्नोप्लास्ट या कंपनीचे उत्पादन असलेले सुमारे दोन हजार प्लास्टिक पिंप पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. कंपन्यांना कोट्यावधी रुपयांची हानी झालेली आहे. महाड फ्लोरिंगचे मालक खालीद चौधरी यांच्या कारखान्यांमध्ये तयार लाकडी दरवाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. तर मार्क्स केमिकलचे मालक आणि महाड उत्पादक संघाचे पदाधिकारी अशोक तलाठी यांनी आपल्या कारखान्यांमध्ये मंगळवारी सुट्टी असल्याने कोणीही उपस्थित नव्हते याच दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी शिरले त्यामध्ये उत्पादन व मशीनचे तसेच संगणकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अशी व्यथा मांडली.

ड्युफ्लाँन ते लक्ष्मी कंपनी पर्यंत नदी वाहत असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. महाड उत्पादक संघ आणि सीईटीपीचे व्यवस्थापक जयदीप काळे यांनी सीईटीपी मध्ये तब्बल सहा फूट पाणी होते त्यामुळे स्टोअर रूम, प्रयोगशाळेचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. औद्योगिक क्षेत्रांमध्ये या पुरा पासून बोध घेत निश्चितच काहीतरी उपाययोजना करण्याबाबत बैठक घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

महाड एमआयडीसीत अनेक कारखाने हे जागतिक मंदीमुळे बंद पडले आहेत. अशा स्थितीत जे काही कारखाने सुरू आहेत त्यांना आता हा फटका बसला आहे. त्यामध्ये स्थानिक कामगार काम करत आहेत परंतु आता या पुरामुळे अनेक कारखाने सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. काही कारखान्यांनी आपली उत्पादने सुरू केली असली तरी ती पूर्णपणे सुरू होत नसल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कारखाना व्यवस्थित  सुरू होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. यामुळे कामगार वर्ग सध्या चिंतेत पडलेला आहे .

विमा कंपन्यांच्या येथे सर्वेक्षण सुरू केले आहे,परंतु सरकारी पंचनामे मात्र या ठिकाणी अद्यापही सुरू झालेले नाही. सर्वप्रथम नागरिक, घरकुले आणि शेती नुकसानीला प्राधान्याने दिले जात आहे. त्यानंतर औद्योगिक क्षेत्रातील पंचनामे केले जातील असे नायब तहसीलदार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Industrial sector affected by floods

टॅग्स