इन्सुली महामार्गावर धुळीने त्रेधा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

बांदा - मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली-डोबाचीशेळ येथे कालव्याच्या अर्धवट कामामुळे वाहनधारकांना धूळ खावी लागत आहे. डिसेंबर अखेरपासून तिलारी कालव्याच्या पुलाच्या कामासाठी हा महामार्ग तोडला होता; मात्र पुलाचे काम पूर्ण होऊन दोन महिने उलटले तरी यावर डांबरीकरणाच्या कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. 

बांदा - मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली-डोबाचीशेळ येथे कालव्याच्या अर्धवट कामामुळे वाहनधारकांना धूळ खावी लागत आहे. डिसेंबर अखेरपासून तिलारी कालव्याच्या पुलाच्या कामासाठी हा महामार्ग तोडला होता; मात्र पुलाचे काम पूर्ण होऊन दोन महिने उलटले तरी यावर डांबरीकरणाच्या कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. 

महामार्गावरील डोबाचीशेळ येथून तिलारी कालवा जातो. महामार्ग ओलांडण्याकरिता डिसेंबरअखेरीस पुलाचे काम सुरू केले. कंत्राटदाराने सांगितल्याप्रमाणे कामही पावसाळ्याअगोदर पूर्ण केले. काम पूर्ण होऊन दोन महिने उलटले तरी या ठिकाणी डांबरीकरणाचे काम रखडले आहे. महामार्ग पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत स्थानिकांच्या शेतातून रस्ता घेतला होता. शासनाचे काम असल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आपली या वर्षाची वायंगणी शेती न करता समाजोपयोगी कामासाठी जमीन उपलब्ध करून दिली. सद्यःस्थितीत या जमिनीत मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला असून यामुळे या वर्षी भातशेती करताना सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्याला जबाबदार कोण, महामार्ग विभाग की तिलारी कालवा प्रशासन, असा सवाल उपस्थित होत आहे.

या ठिकाणी कोणताच फलक न लावल्याने अपघात होतात. महामार्गावरून दिवसागणिक हजारो वाहने या महामार्गावरून ये-जा करतात. या सर्वच्या सर्व वाहनधारकांना धुळीचा सामना करत प्रवास करावा लागत आहे. मोठे वाहन गेल्यानंतर या ठिकाणी धूळ उडाल्यामुळे छोटे- मोठे अपघात होतात. चार दिवसांपूर्वी रात्री दहाच्या सुमारास भरधाव वेगाने ट्रक गेला आणि त्याच्यामागून असणाऱ्या मोटारीला महामार्गाचा अंदाज न आल्याने या ठिकाणी असलेल्या खडीवर ती मोटार आदळली. त्याच्या मागून आलेला दुचाकीस्वार त्या मोटारीवर आदळला होता. यात दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली. मोटारीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण, असा सवाल वाहनधारक करत आहेत.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
गेले दोन महिने या ठिकाणी काम अर्धवट असल्याने वाहनधारकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कोणीही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलेले दिसत नाही. याचा फटका सामान्यांना बसत आहे.

ठेकेदार गायब
पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी ठेकेदार दिवस-रात्र उभा दिसत होता; मात्र काम पूर्ण केल्यानंतर महामार्गाचे अर्धवट काम सोडून ठेकेदार गायब झाले आहेत.

Web Title: insully highway