वाहनधारकांनो सावधान...महामार्गावर नजर "इंटरसेक्‍टर कार'ची ( व्हिडिओ)

Inter sector Car On Mumbai - Goa Highway Be Aware
Inter sector Car On Mumbai - Goa Highway Be Aware

रत्नागिरी - वाहनधारकांनो सावधान... महामार्गावर नियम पायदळी तुडवून वाहन चालवित असाल तर तुमच्यावर नजर ठेवणारी आधुनिक "इंटरसेक्‍टर कार' महामार्ग पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाली आहे. वेगमर्यादा, विनाहेल्मेट, सीट बेल्ट नसणे, मद्य घेऊन वाहन चालविणे आता महागात पडणार आहे. ही कार तीन किमीपर्यंत वाहनाचा वेग तपासू शकते. तीनशे मीटरपर्यंत फोटो घेते. त्यामुळे नियम तोडला की थेट सर्व्हरवर वाहन नंबर जाऊन दंडाचे चलन संबंधिताच्या नावे निघणार आहे. राज्याला 96 कार मिळाल्या असून त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चार कार आहेत. 

महामार्गावर वाहन तपासणी केंद्रासमोर उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना हात दाखवून शिटी मारून थांबवावे लागते. महामार्गावर पोलिसांचा हा 24 तास कार्यक्रम सुरू असतो. त्यात कोणी वाहनधारक थांबतो, कोणी थांबत नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होते किंवा कोर्टात खटला भरला जातो; परंतु महामार्ग वाहतूक पोलिसांचे हे काम आता थांबणार आहे. महामार्ग पोलिस आता हायटेक झाले आहेत. या पोलिसांच्या ताब्यात आता नव्या हायटेक टेक्‍नॉलॉजी असलेल्या गाड्या दाखल झाल्या आहेत. 

व्हॅनमुळे होणार फायदा

आतापर्यंत हातवारे करून वाहनांना थांबवायचो. मोठी-छोटी वाहने थांबवून चुका निदर्शनास आणून द्यायचो. वाहतूक नियम तोडल्यास असे दंड आहेत, असे सांगावे लागे. आता ही व्हॅन मिळाल्याचा फायदा होणार आहे. आधुनिक यंत्राद्वारे स्पीड तपासू शकतो. इंटरनेटद्वारे परस्पर संबंधिताला दंड होणार आहे. ब्रीथ ऍनालायझरची व्यवस्थाही आहे. 
- अमर पाटील, हातखंबा महामार्ग पोलिस निरीक्षक 

अत्याधुनिक टेक्‍नॉलॉजी असलेली एकमेव कार

इंटरसेक्‍टर कार आणि त्यामधील अत्याधुनिक यंत्रणा वाहनांची वेगमर्यादा, विनाहेल्मेट प्रवास, सीट बेल्ट न लावणे, गाडीला बारलाईट, सायरन, गाडीची काच किती ब्लॅक (काळी) आहे हे देखील तपासता येणार आहे. देशातील अत्याधुनिक टेक्‍नॉलॉजी असलेली ही एकमेव कार आहे. महाराष्ट्रात जवळपास 96 गाड्या महामार्ग पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर चार गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करताना नियम मोडला की, दंडाचे चलन थेट घरी येणार आहे. 
 

कोकणसाठी चार कार

महाराष्ट्रामध्ये इंटरसेक्‍टर कार दाखल झाल्या आहेत. या कारमुळे रस्ते अपघात कमी करण्यास मदत होणार आहे. सर्वांत अत्याधुनिक यंत्रणा यामध्ये आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चार कार दिल्या आहेत. 
- राकेश यादव, युनिट व्यवस्थापक 


 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com