अजित यशवंतरावांवरून फूट कॉंग्रेसला घातक 

अजित यशवंतरावांवरून फूट कॉंग्रेसला घातक 

राजापूर - अजित यशवंतराव यांच्या प्रवेशाच्या मुद्‌द्‌यावरुन कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गंत असंतोष अद्यापही खदखदत असून त्याचा प्रक्षोभ थेट पक्षनिरिक्षकांसमोर झाला. यशवंतराव यांचा कॉंग्रेस प्रवेश व त्यांची संभाव्य विधानसभेची उमेदवारी सध्या कॉंग्रेसमध्ये कळीचा मुद्दा बनली असून त्यातून कॉंग्रेसतर्गंत बंडाळी व गटातटाचे राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. याचा फटका कॉंग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बसण्याची शक्‍यता आहे. 

तालुक्‍याच्या राजकारणामध्ये नंबर दोनचा राजकीय पक्ष म्हणून ओळख असलेल्या कॉंग्रेसमधील अंतर्गंत वाद गेल्या काही महिन्यांपासून उफाळून आला आहे. लोकसभेतील अपयश बाजूला सारून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये यशाची फळे चाखण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकणे व नव्याने पक्षाला उभारी देण्याच्या उद्देशाने राजापूर विधानसभा मतदारसंघातील युवा नेते यशवंतराव यांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

त्याबाबत कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळव्यामध्येही चर्चाही झाली होती. मात्र, त्याचवेळी कॉंग्रेसमधील काहींनी यशवंतराव यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. त्याबाबत कोणताही ठोस निर्णय न घेता कॉंग्रेसच्या वरिष्ठांनीही यशवंतराव यांच्या प्रवेशाचा मुद्दा भिजत ठेवला आहे. त्याचे पडसाद नुकतेच कॉंग्रेसच्या निरिक्षकांसमोर उमटले. 

कॉंग्रेससाठी धोक्‍याची घंटा.... 
लोकसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्लेल्या कॉंग्रेसला आगामी विधानसभेमध्ये विजयाचे प्रमुख दावेदार असलेल्या शिवसेनेला आव्हान द्यायचे आहे. त्यासाठी संघटनात्मक बांधणीसह कार्यकर्ता उभारणी आणि संघटनाची आवश्‍यकता असताना मात्र, कार्यकर्त्यांमध्ये यशवंतराव यांच्या पक्षप्रवेशावरून उफाळून आलेला वाद सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यावर योग्य तो तोडगा निघून तो न शमल्यास आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कॉंग्रेससाठी धोक्‍याची घंटा म्हणावी लागले. 

संभाव्य उमेदवारी ठरतेय कळीचा मुद्दा 
यशवंतराव यांच्या कॉंग्रेस प्रवेशासाठी आग्रही असलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांच्या प्रवेशाचे समर्थन केले जात आहे. गावोगावी व वाडीवस्तीवर दांडगा जनसंपर्क असलेले यशवंतराव यांच्याकडे विधानसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. आमदार साळवी यांना पराभूत करायचे असेल तर, यशवंतराव यांना उमेदवारी मिळणे गरजेचे आहे. त्याचवेळी, कॉंग्रेसमधील यशवंतराव विरोधी गटाकडून विधानसभेसाठी पक्षातील सक्रीय कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, असा आग्रह धरला जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com