रसायनवाहू वाहनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न कायम

रसायनवाहू वाहनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न कायम

मोठी वनसंपदा लाभलेला रायगड जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात औद्यागिक विकास झाला आहे. त्यामुळे रसायनांची मोठ्या प्रमाणात मुंबई - गोवा महामार्गावरून वाहतूक होते. या वाहनांमध्ये असणारे रसायन हवा व पाण्याच्या संपर्कात आल्यावर मोठी दुर्घटना होते. त्याचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर तर होतोच, शिवाय रसायने पाण्यात मिसळल्याने जलचरांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. अशा घातक रसायन वाहतुकीवर मर्यादा आणणे, त्याची वेळोवेळी तपासणी करणे, वाहनचालकांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे असताना, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहत नाही.  त्यामुळे हा प्रश्‍न गंभीर  झाला आहे. 

मुंबई - गोवा महामार्गावर रसायनांची वाहतूक करणारे ट्रक व टॅंकर्स यांच्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांची सुरक्षितता, रस्ता सुरक्षितता याचबरोबर मानवी व वन्य प्राण्यांच्या आरोग्याचा प्रश्नही समोर आला आहे. महाड येथील केंबुर्ली गावाजवळ सावित्री नदीकिनारी गंधकाची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने तेथे सांडलेल्या गंधकाने पेट घेतल्यामुळे परिसरामध्ये असुरक्षितता निर्माण झाली होती. हे गंधक सावित्री नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याने सावित्री नदीतील मगरींच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता.

रायगड जिल्ह्याचा प्रामुख्याने विचार करता जिल्ह्यामध्ये महाड, रोहा, नागोठणे, तळोजा, माणगाव तालुक्‍यातील भागड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आहेत. याशिवाय रायगड जिल्ह्याच्या पुढे रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम व गोव्यापर्यंत या ठिकाणी दररोज हजारो रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा सुरू असते. या रसायनांच्या वाहतूक करणाऱ्या वाहनांना अपघात झाल्यास परिसरामध्ये निर्माण होणारा धोका आणि त्याचे परिणाम याचा फारसा विचार या परिसरात केला गेलेला दिसत नाही.

गेल्या वर्षभरामध्ये अशा प्रकारे रसायनवाहू वाहनांचे सुमारे २० अपघात झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. जानेवारी महिन्यामध्ये खारपाडा येथे गॅस टॅंकर कलंडल्याने मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. अशाच प्रकारे कशेडी घाटामध्येही अनेकदा रसायनवाहू टॅंकर रस्त्यावर कलंडल्याने टॅंकरमधून बाहेर पडणाऱ्या वायुगळतीने परिसरातील अनेक गावे हलवावी लागलेली होती. 

मागील वर्षी दासगाव येथेही अशाच प्रकारचा टॅंकर कलंडल्याने ग्रामस्थांच्या डोळ्यांची आग होऊ लागली होती. त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला होता. या वेळी ग्रामस्थांनी घरातून पळ काढलेला होता. या सर्व घटनांचा परामर्श घेता अशा वाहनांमुळे मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक व्यवस्था धोक्‍यात सापडलेली आहे. त्याहीपेक्षा नागरिकांची सुरक्षितता, रसायनांच्या गळतीनंतर परिसरात जाणवणारे त्याचे दुष्परिणाम, तसेच अशा प्रकारची रसायने नदी-नाल्यात 
मिसळल्यानंतर तेथील जलचर प्राण्यांना भोगावे लागणारे त्याचे परिणाम हे सारे प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत. 

सरकारी आपत्ती व्यवस्थापनाच्या आराखड्यामध्ये रसायनवाहू टॅंकरमुळे होणाऱ्या आपत्तीकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे यापासून निर्माण होणारी आपत्ती भविष्यात गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्‍यता आहे. 

रसायन वाहतुकीचे यंत्रणेला गांभीर्य नाही
रसायनवाहू वाहनांची वाहतूक करणारा चालक हा सुशिक्षित असला पाहिजे आणि त्याला रसायन हाताळणीबाबत व अपघात झाल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देणे बंधनकारक असते. अशा चालकांकडे रसायनांची माहिती देणारे ट्रम्प कार्ड सक्तीचे केलेले असते. त्यांची तपासणीही करणे आवश्‍यक असते; परंतु अशा प्रकारे रस्त्यांवर धावणारे हे जिवंत बॉम्ब त्यांची तपासणी फारशी गांभीर्याने होताना दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या वाहनांच्या अपघातांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाड येथे एक महिन्यापूर्वी अपघात झाला होता, तरीही तेथील रसायनांचे गांभीर्य येथील पोलिस व अन्य यंत्रणेला नव्हते. त्यामुळे या ठिकाणी आग लागण्याची घटना घडली होती. हे रसायन पावसामुळे पाण्यात मिसळल्याने सावित्री नदीतील मगरींचे अस्तित्वही धोक्‍यात आले आहे.

साधनसामुग्रीची आवश्‍यकता
रसायनवाहू वाहनांना अपघात झाल्यास या ठिकाणी तातडीने स्थानिक नागरिक सर्वप्रथम पोहोचतात. त्यानंतर पोलिस यंत्रणा मदतकार्याला येत असते. त्यामुळे या दोन्ही यंत्रणांना सर्वप्रथम रसायनांबाबत साक्षर करणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या अपघातांच्या मदतकार्यासाठी सेल्फ कन्टेन्ड ब्रीथिंग अपारेट्‌स (एसीबीए) आणि स्पिल कंट्रोल किटची अत्यंत आवश्‍यकता असते. ही उपकरणे सरकारी पातळीवर ठेवणे आवश्‍यक आहे; परंतु तशा प्रकारची व्यवस्था कुठेही दिसत नाही. जिल्ह्यातील आठ मोठ्या कंपन्यांना सरकारी यंत्रणेला अशा वेळी मदतकार्य करावे यासाठी प्रवृत्त केलेले आहे. या कंपन्या अशा वेळी मदतकार्यासाठी पुढेही येत असतात. परंतु, प्रत्यक्ष प्रशासनाकडे मात्र साधनसामुग्री नाही. रसायनवाहू अपघातांचा प्रश्न भविष्यात रस्ते वाहतुकीपुरता मर्यादित न राहता नागरिकांची सुरक्षितता, वन्यजीव सुरक्षितता, हवा व पाणी प्रदूषण यांनाही कारणीभूत ठरणारा आहे.

रसायनांबाबत अनभिज्ञता दूर करा
महामार्गांवर रसायनवाहू वाहनांना अपघात झाल्यानंतर यामध्ये असणाऱ्या रसायनांची माहिती, अपघात झाल्यास तातडीने करावयाच्या उपाययोजना, परिसरातील ग्रामपंचायतींना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण याची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत असते. अशा प्रकारचे अपघात घडल्यास प्रत्यक्ष मदत करण्यास धावणाऱ्या वाहतूक पोलिसांनाही याबाबतची फारशी माहिती नसते. अशा वाहनांवर असणारे टॅंकरचालकही अल्पशिक्षित असल्याने त्याचा मोठा फटका या वेळी बसतो. वाहनांमध्ये असणारे रसायन हवा व पाण्याच्या संपर्कात आल्याने त्यावर कोणती अभिक्रिया होते अथवा त्यापासून कोणती वायुगळती होऊ शकते, याबाबत सारे जण अनभिज्ञ असतात. त्यामुळे भविष्यामध्ये यापासून मोठ्या आपत्तीचा धोका निर्माण झाला आहे. अशा घटनांनंतर वाहतूक व्यवस्थाही कोलमडून जात असते. अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील कंपन्यांचे सुरक्षा अधिकारी मदतीला येत असतात. परंतु, अपघाताच्या मदतीसाठी स्वतंत्र उपकरणे व पथके लागतात. कंपन्यांकडून अशी साधने जरी पुरवली जात असली, तरी सरकारी पातळीवर मात्र अशा प्रकारच्या ठोस उपाययोजना अमलात आणलेल्या दिसत नाहीत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com