कु़डाळ पोस्टातील अपहाराची सीबीआय चौकशी होणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

कुडाळ -  येथील पोस्ट आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोषींची सीबीआय चौकशी होणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे पोस्ट कार्यालय बंद आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी आज दिली.

कुडाळ -  येथील पोस्ट आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोषींची सीबीआय चौकशी होणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे पोस्ट कार्यालय बंद आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी आज दिली.

पोस्ट कार्यालय गैरव्यवहार पार्श्‍वभूमीवर अपहाराचा हा आकडा सुमारे कोट्यवधींच्या घरात पोचला आहे. पोस्ट कार्यालयाकडून संबंधित एजंटसह कर्मचारीही जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी चालढकलपणा होत आहे. आमदार नाईक यांनी पोस्ट कार्यालयात चार दिवसांपूर्वी भेट देऊन पोस्टाचे अधिकारी श्री. राणे यांच्याशी चर्चा केली. यावेळी आमदार नाईक यांनी गोरगरीब जनतेने पोस्टावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात पैसा ठेवला आहे. आज या पोस्ट कार्यालयात करोडोचा अपहार झालेला आहे.

या अपहारमध्ये जे  कोण गुंतलेले असतील त्याच्यावर तात्काळ कारवाई आवश्‍यक आहे. केवळ एजंटच जबाबदार नाही तर संबंधित कर्मचारी अधिकारी जो कोण दोषी असेल त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ही कारवाई सोमवारपर्यंत झाली पाहिजे. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया न झाल्यास चार दिवसानंतर पोस्ट कार्यालय उघडू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.

गैरव्यवहारात कोणत्याही एजंटला पाठीशी घातले जाणार नाही. ज्यावेळी पोस्ट कार्यालयाचा गैरव्यवहार उघडकीस झाला त्यावेळी सर्वप्रथम मीच गोरगरीब जनतेचे पैसे मिळावेत यासाठी गेलो होतो. त्यानंतर इतर सर्वजण जागे झाले. सर्वसामान्य गरिबांचा पैसा आहे. त्यामुळे कोणत्याही एजंटला यामध्ये पाठीशी घातले जाणार नाही. 

लवकरच सीबीआयकडे तक्रार
एजंटनी पोस्टाचा पैसा अन्य कुठे वापरला? कुठे गुंतवणूक केली? कोणाला दिले? याचीसुद्धा चौकशी होणार आहे. त्याची सीबीआय चौकशी केली जाणार, अशी माहिती पोस्ट अधिकारी रमेश बाबू यांनी आमदार नाईक यांना दिली. त्यामुळे पोस्ट विभागीय कार्यालय गोवा यांच्यामार्फत मुंबई सीबीआय कार्यालयात तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने शिवसेनेचे ‘पोस्ट कार्यालय बंद’ आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे, अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Kudal Post office fraud