महामार्गचाैपदरीकरण : अचूक पत्ता सांगणारा आधारवड गमावणार 

मुझफ्फर खान
गुरुवार, 16 मे 2019

परिसरात 50 हून अधिक वर्षे काजूचे झाड दिमाखात उभे आहे. झाडाभोवती केलेल्या दगडी पारावर प्रवासी सावली घेत बसची प्रतीक्षा करत विसावलेले दिसतात. झाडाच्या फांद्यावर पक्षांचा वावर असतो. चौपदरीकरणाच्या कामात रस्त्याच्या बाजूने खेटलेली सर्वच दुकाने, टपऱ्या मागे हटविली गेली आहेत. पुढील काही दिवसांत हे काजूचे झाडही तोडले जाणार आहे. त्यानंतर मायेने सावली देणारा हा वृक्ष फक्त आठवणीचा भाग ठरणार आहे. 

चिपळूण - सावर्डे परिसरात चौपदरीकरणाने गती घेतल्यामुळे येथील बसथांब्यावर उन्हाच्या काहिलीत विसावण्यासाठी थांबलेल्या प्रत्येकाच्या तोंडातून अस्पष्ट, परोपकारभावनेतून येणारे, ऋण व्यक्‍त करणारे बोल मनाला ऐकावयास मिळतात. ते बोल आहेत एका दीर्घ वयाच्या आधारवडासाठी. चौपदरीकरणात नष्ट होणाऱ्या बस थांब्यावरील जून्या काजूच्या झाडासाठी. 

सावर्डे हे जिल्ह्यातील शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. हमरस्त्यावरील गावाच्या मुख्य बसथांब्यावर नेहमीच शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक - युवती, नोकरदार स्त्री-पुरुष, वयोवृध्दांची गर्दी असते. माणसांच्या गर्दीतून वाट काढत टपरीच्या विसाव्याला बसलेली गुरे हे इथले नेहमीचे चित्र. याच परिसरात 50 हून अधिक वर्षे काजूचे झाड दिमाखात उभे आहे. झाडाभोवती केलेल्या दगडी पारावर प्रवासी सावली घेत बसची प्रतीक्षा करत विसावलेले दिसतात. झाडाच्या फांद्यावर पक्षांचा वावर असतो. एखादा पुजेचा अथवा करमणुकीच्या कार्यक्रमाचा फलक या वृक्षाला लटकलेला असतो.

काही केबल्स या झाडाचा आधार घेवून तरंगत आहेत. खोडावर छोटा जाहिरात फलक लटकत असतो. आजूबाजूच्या टपऱ्या, दुकानांनी आपल्या खोक्‍यासमोर केलेली बसण्याची व्यवस्था, त्यावर आच्छादनासाठी लावलेल्या कापडाची टोकेही याच झाडाला बांधलेली असतात. अशा वेगवेगळ्या खुणा अंगावर मिरवत हे काजूचे झाड अद्याप पूर्वीच्याच जोमाने ऊन, वारा, पाऊस या सर्वांपासून प्रवाशांचे रक्षण करित आहे. आपल्याकडे जे आहे त्याची किंमत ते गमावल्यानंतरच कळते. तसेच या काजूच्या झाडाचे होणार आहे. चौपदरीकरणाच्या कामात रस्त्याच्या बाजूने खेटलेली सर्वच दुकाने, टपऱ्या मागे हटविली गेली आहेत. पुढील काही दिवसांत हे काजूचे झाडही तोडले जाणार आहे. त्यानंतर मायेने सावली देणारा हा वृक्ष फक्त आठवणीचा भाग ठरणार आहे. 

आपला ठावठिकाणा दुसऱ्या व्यक्‍तीला सांगताना "स्टॅंडवर काजूच्या झाडाखाली भेट' असा गुगलपेक्षाही अचूक पत्ता शोधणाऱ्याला सापडावा असे हे सुपरिचीत झाड म्हणजे जणूकाही सावर्डेमधील लॅंडमार्क होते. ते चौपदरीकरणात जाणार आणि एक लॅंडमार्क आम्ही गमावणार. 
- एस. पी. पवार,
सावर्डे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Mumbai Goa Highway four track Ground report