गणेशचतुर्थीपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

कणकवली - गणेशचतुर्थीपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावेत. महामार्गावरील पुलांचीही सुरक्षितता तपासण्यात यावी, अशी मागणी येथील तालुका पत्रकार संघाच्यावतीने आज प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

कणकवली - गणेशचतुर्थीपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावेत. महामार्गावरील पुलांचीही सुरक्षितता तपासण्यात यावी, अशी मागणी येथील तालुका पत्रकार संघाच्यावतीने आज प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

येथील तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी आज प्रांताधिकारी नीता सावंत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे, महामार्गावरील पुलांची झालेली दयनीय अवस्था याबाबतची माहिती देण्यात आली.

गणेशोत्सव काळात महामार्गावर वाहतुकीत वाढ होते. मुंबईहून चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात येत असतात. खड्यांमुळे ब्रिटिशकालीन पुल कमकुवत होत आहेत. जीवघेण्या खड्यांमधून प्रवास करताना दुचाकीस्वारांना मानदुखी, कंबरदुखीचे त्रास होत आहेत. कणकवली गडनदी पूल, बेळणे पूल, कसाल पूल आणि नांदगाव पियाळी पूल या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे  गणेशोत्सवापूर्वी बुजवले गेले नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा कणकवली तालुका अध्यक्ष भगवान लोके यांनी दिला आहे 

प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी येत्या चार दिवसांत महामार्ग सुरळीत आणि सुरक्षित करण्याबाबतचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग आणि संबंधित ठेकेदारांना दिले जातील अशी ग्वाही दिली.

ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, जिल्हा पत्रकार संघाचे सचिव गणेश जेठे, उपाध्यक्ष अशोक करंबेळकर, तालुकाध्यक्ष भगवान लोके, सचिव नितीन सावंत, खजिनदार माणिक सावंत यांच्यासह संतोष राऊळ, रमेश जोगळे, अजित सावंत, राजेश सरकारे, मोहन पडवळ, सुधीर राणे, तुषार सावंत, स्वप्नील वरवडेकर, रमेश जामसंडेकर, प्रदीप भोवड, संजय राणे, अनिकेत उचले, पंढरीनाथ गुरव, तुळशीदास कुडतरकर, संजय बाणे, भास्कर रासम आदी उपस्थित होते.

Web Title: issue of Potholes on Mumbai Goa Highway