वेंगुर्लेतील पर्यटन "फास्टट्रॅक'वर कधी येणार? 

दीपेश परब 
सोमवार, 24 डिसेंबर 2018

वेंगुर्लेचा पर्यटन विकास होतोय यात कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही; मात्र या विकासात अपेक्षीत गती आणि नियोजन मात्र पहायला मिळत नाही. यामुळे वेंगुर्लेला पर्यटनातून सध्या आणि भविष्यात किती फायदा होणार हा मात्र प्रश्‍न आहे. या पर्यटन विकासाला अजूनही आकार द्यायला संधी आहे. वेंगुर्लेचे हे पर्यटन विश्‍व कसे आहे. ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न. 

सिंधुदुर्गात मालवणपाठोपाठ पर्यटन दृष्ट्या विकसित होणारा तालुका म्हणून वेंगुर्लेकडे पाहिले जाते. या तालुक्‍याच्या एकाबाजुला पर्यटनाची पंढरी असलेले गोवा तर दुसऱ्या बाजूला या क्षेत्रात बाळसे धरलेले मालवण आहे. वेंगुर्लेत पर्यटन सुविधांसाठी आतापर्यंत लाखो रूपयांचा निधीही खर्च झाला.

बऱ्याच घोषणाही झाल्या. वेंगुर्लेचा पर्यटन विकास होतोय यात कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही; मात्र या विकासात अपेक्षीत गती आणि नियोजन मात्र पहायला मिळत नाही. यामुळे वेंगुर्लेला पर्यटनातून सध्या आणि भविष्यात किती फायदा होणार हा मात्र प्रश्‍न आहे. या पर्यटन विकासाला अजूनही आकार द्यायला संधी आहे. वेंगुर्लेचे हे पर्यटन विश्‍व कसे आहे. ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न. 

वेंगुर्लेचे आकर्षण 
वेंगुर्ले तालुक्‍याने कित्येक वर्षापासून आपले आकर्षण टिकवून ठेवले आहे. राजे रजवाड्यांच्या काळात येथील जलमार्ग आर्थिक संपन्नतेची हाक द्यायचे. जलमार्गामुळे येथील बाजारपेठ सक्षम होती. पश्‍चिम महाराष्ट्रासह अनेक प्रांतांना जगाशी व्यापारी दृष्ट्या जोडणारा वेंगुर्ले हा महत्त्वाचा दुवा होता. डच, पोर्तुगीज, इंग्रजांना वेंगुर्लेचे कायमच आकर्षण राहिले. यातून वेंगुर्ल्यांच्या वर्चास्वासाठी बऱ्याच लढायाही झाल्या. पुढे जलवाहतूक बंद पडली. राजेरजवाडेही इतिहासाच्या पानांची शोभा वाढवू लागली. याबरोबरच वेंगुर्लेचे महत्त्वही कमी होत गेले. 

इतिहासाचे साक्षिदार 
पश्‍चिम किनारपट्‌टीवरील दक्षिणेकडे असलेले सुरक्षीत बंदर म्हणून वेंगुर्लेला जागतिक स्तरावर ओळख मिळाली होती. वेंगुर्लेपासून जवळच निवतीरॉक येथे असलेले दीपगृह शेकडो वर्षांपासून याची साक्ष देत आहे. हॉलंडमधील डच व्यापारी त्या काळात मसाल्याच्या व्यापाऱ्यासाठी येथे आले. त्यांनी सोळाव्या शकतकात उभारलेल्या वखारीचे भग्न अवशेष आजही वेंगुर्लेत आहे. 1820 मध्ये इंग्रजांनी वेंगुर्लेचा ताबा घेतल्यावर येथे लष्करी तळ टाकलेल्या जागेची आजही कॅम्प म्हणून ओळख आहे. इंग्रजांनी कलकत्ता व मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटची याठिकाणी उभारलेली प्रतिकृती लोकांना भुरळ पाडते. या आणि अशा कितीतरी गतवैभवाची साक्ष देणाऱ्या गोष्टी वेंगुर्लेत आहेत. याचा पर्यटनाला नियोजनपूर्ण उपयोग झाला तर या तालुक्‍याची आर्थीक उन्नती वेगाने होईल. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. 

पर्यटनाची सुरूवात 
तसा विचार केल्यास वेंगुर्लेच्या पर्यटन विकासासाठी ठोस असे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. घोषणा, सल्ले आतापर्यंत अनेकांनी दिले; मात्र येथे पर्यटक येण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. तरीही पर्यटन वाढत आहे. गेल्या दहा वर्षात तालुक्‍यात अनेक हॉटेल्स उभी राहिली. गोव्याकडचा पर्यटक वेंगुर्लेकडे वळू लागला. असे असले तरी शासन मात्र रस्ते, वीज, पाणीपुरवठा, निवासीगृहे, स्वच्छतागृहे अशा सोयी निर्माण करण्याच्या दृष्टीने कमी पडत असल्याचे चित्र आहे. 

कुठे वाढतेय पर्यटन 
तालुक्‍यातील पर्यटन गोव्याच्या आणि मालवणच्या सीमेलगत वाढताना दिसत आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेले वेंगुर्ले शहर मात्र तुलनेत कमी पडत आहे. तालुक्‍यातील मालवणनजिक असणाऱ्या भोगवे, निवती, परुळे, म्हापण तर गोवा राज्याच्या नजिक असलेल्या रेडी शिरोडा आदी भागातच पर्यटक जाणे पसंत करतात. अपेक्षेप्रमाणे तालुक्‍यातील इतर भागाचा पर्यटन दृष्ट्‌या विकास अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. हा प्रवास पाहता मालवण आणि गोव्याचे पर्यटन वेंगुर्लेपर्यंत विस्तारतेय असे म्हणणे योग्य ठरेल. याचाच अर्थ वेंगुर्लेची पर्यटनाच्या दृष्टीने स्वतंत्र अशी ओळख निर्माण करण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. स्वतंत्र ओळख निर्माण होत नाही तोपर्यंत पर्यटनाचा या तालुक्‍याला अपेक्षित फायदा होणार नाही. 

खासगी सुविधांत वाढ 
वेंगुर्ले तालुक्‍याची क्षमता शासनकर्त्यांना ओळखता आली नसली तरी खासगी गुंतवणूकदार मात्र इथल्या पर्यटन व्यवसायात पूर्ण ताकदीने उतरल्याचे दिसते. यामुळेच मालवण तालुक्‍यापासून जवळ असलेल्या चिपी, परुळे, भोगवे, निवती तसेच गोवा राज्यापासून जवळ असलेल्या शिरोडा, रेडी, आरवली आदी भागात गेल्या दहा वर्षात हॉटेल व्यवसाय फोफावला आहे. याठिकाणी कोको श्‍यामबाला सारखे जिल्ह्यातील एकमेव आंतरराष्ट्रीय हॉटेलही उभे राहिले आहे. याचा पर्यटन हंगामात एका आठवड्याचा दर सुमारे दोन ते अडीच लाख एवढा आहे. याचप्रमाणे या पंचक्रोशीमध्ये असलेली मधुराम माचली रिसॉर्ट, परुळे कुशेवाडा येथील राणे रिसॉर्ट, भोगवे येथील लीला बांबू हाऊस या सारखी एका दिवसाला 7 हजारपर्यंत दर असणारी अनेक हॉटेल्स याठिकाणी आहेत. 

संधी मिळवायच्या कशा? 
याच तालुक्‍यात चिपी येथे विमानतळ साकारले आहे. या विमानतळामुळे वेंगुर्ल्यासही व्यापारी दृष्ट्‌या पुन्हा महत्व प्राप्त होण्याची संधी मिळणार आहे. तालुक्‍यातील बरेच किनारे अजूनही पर्यटकांच्या नजरेपासून दुर आहेत. ते पर्यटन प्रवाहात आणण्याची गरज आहे. स्थानिकांना हॉटेल मॅनेजमेंट, केटरींग टुरिझम ऍण्ड गाईडन्स यांचे प्रशिक्षण देणारे छोटे छोटे कोर्सेस विकसित करावे लागतील. आणि हे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही इथेच विकसित कराव्या लागणार आहेत. 

भोगवे समुद्र किनाऱ्याला आयएसओ मानांकन मिळाले असून, याठिकाणी पर्यटकांसाठी वाटर स्पोर्टस, सुसज्ज राहण्यासाठी हॉटेल्स, बॅक वाटरची सुविधा, डॉल्फिन दर्शन आदी पर्यटकांना अपेक्षेप्रमाणे मिळत असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढत आहे.
- शरद शिंदे
, ग्रामसेवक, भोगवे 

शिरोडा, रेडी, आरवली भागाचेही पर्यटकांना आकर्षण वाढत आहेत. याठिकाणी देश विदेशातील पर्यटक भेटी देत असतात. वाढते पर्यटन लक्षात घेता शिरोडा वेळागर येथे गार्डन, वाटर स्पोर्टस, योगा अभ्यास केंद्र, पर्यटन व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, मत्स्यालय यासाठी ग्रामपंचयातचे प्रयत्न सुरू आहेत. 
- सुनील चव्हाण,
ग्रामसेवक, शिरोडा 

वेंगुर्ला नगरपालिकाला पर्यटन करमधून निधी मिळत नसला तरीही सागरेश्वर, बंदर याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमुळे अर्थव्यवस्था वाढत आहे. तसेच पालिकेने डम्पिंग ग्राऊंडचे केलेले स्वच्छ भारत पर्यटन स्थळ पाहण्यासाठी विविध भागातून पर्यटक येतात. पर्यटकांचा ओघ लक्षात घेता याठिकाणी विविध हॉटेल्स, होम स्टे, दुकाने वाढत आहेत. झुलता पूल, निमुजगा कडा रस्ता, सागरबंगला ते दीपगृहापर्यंत जाणाऱ्या पायऱ्यांचे सुशोभीकरण, नावबाग सागर किनारा नगरपरिषदेकडे घेऊन त्याचा विकास, मांडवी बंदर सुशोभीकरण, सागर बांगला सुशोभीकरण, मुंबई तारापूर प्रमाणे मत्स्यालय, नाट्यगृह, सिनेमा थिएटर यासाठी नगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. 
- वैभव साबळे,
मुख्याधिकारी, वेंगुर्ले पालिका. 

पर्यटन दृष्टिक्षेपात 

  • 2015- 16 या आर्थिक वर्षात कोकण ग्रामीण पर्यटन विकास 
  • कार्यक्रमाअंतर्गत वेंगुर्लेलेला प्राप्त निधी - 1 कोटी 21 लाख. 
  • वेंगुर्ले तालुक्‍याचा पर्यटन विकासाचा खरा कालावधी - गेली 5 वर्षे. 
  • पर्यटनातून शिरोडा ग्रामपंचायतीला दरवर्षी मिळणारा महसूल - 3 लाख. 
  • पर्यटनातून भोगवेला मिळणारा महसूल - 70 हजार. 
Web Title: Issue of Vengurle Tourism