`जल जीवन`मधून `या` जिल्ह्याला सव्वा लाख नवे नळ

jal jeevan yojana tap connection konkan sindhudurg
jal jeevan yojana tap connection konkan sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग) - केंद्राने नव्याने सुरू केलेल्या जल जीवन अभियान अंतर्गत 2020-21 या चालू आर्थिक वर्षात जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेला 1 लाख 18 हजार 507 कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणी करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात एकूण 1 लाख 89 हजार 270 वैयक्तिक नळ जोडणी लाभार्थी आहेत. त्यातील 70 हजार 763 लाभार्थ्यांना यापूर्वीच नळ जोडणी दिली आहे. 

केंद्राने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे नामांतर करून "जल जीवन अभियान', असे केले आहे. शासनाने नाव बदलताना योजनेचे स्वरूपही बदलले आहे. राष्ट्रीय पेयजलमध्ये गाव किंवा वाडी वस्तीसाठी योजना राबविली जात होती. आता ही योजना प्रत्येक कुटुंबासाठी राबविली जाणार आहे. पूर्वीच्या योजनेत सार्वजनिक नळ जोडणी असायची. नव्या योजनेत वैयक्तिक नळ जोडणी दिली जाणार आहे. याचाच अर्थ एखाद्या वाडीत योजना राबविलेली असेल; परंतु भौगोलिक परिस्थितीमुळे त्याचा लाभ काही कुटुंबांना होत नसल्यास "जल जीवन'मध्ये याच योजनेचा विस्तार करून ती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविली जाणार आहे. 

यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत त्या-त्या जिल्ह्यात असलेल्या योजना व लाभार्थी तसेच किती लाभार्थ्यांजवळ नळ योजनेची वैयक्तिक जोडणी नाही, याची माहिती घेतली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 741 महसुली गावे आहेत. एवढ्या महसुली गावांत 1 लाख 89 हजार 270 वैयक्तिक नळ जोडणी लाभार्थी आहेत. त्यातील 70 हजार 763 लाभार्थ्यांना राष्ट्रीय पेयजलमधून वैयक्तिक नळ जोडणी मिळाली आहे. परिणामी 8 महसुली गावांत 100 टक्के वैयक्तिक नळ जोडणी पूर्ण झाली आहे. तर उर्वरित 733 गावांतील 1 लाख 18 हजार 507 कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणी द्यायची आहे. 

शिल्लक जोडणीबाबत आदेश 
केंद्राने आता वाडीसाठी नाही तर कुटुंबासाठी नळ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यक्तिगत नळ जोडणीला प्राधान्य आहे. परिणामी शिल्लक 733 महसुली गावातील 1 लाख 18 हजार 507 व्यक्तिगत नळ जोडणी जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला द्यायची आहेत. हे उद्दिष्ट 2020-21 मध्ये या विभागाला पूर्ण करण्याचे आदेश शासनाचे प्राप्त झाले आहेत. 

अद्याप निकष प्राप्त नाहीत 
देशातील ग्रामीण जनतेला पिण्याचे पाणी मुबलक व वस्तीपर्यंत मिळण्यासाठी केंद्राने सुरुवातीला भारत निर्माण ही योजना आणली होती. कालांतराने योजनेचे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल असे नामांतर केले. यावेळी पूर्वीच्या योजनेत बदल करीत नवीन निकष आणले होते. आता तिसऱ्या वेळी योजनेचे नाव बदलताना निकष सुद्धा बदलले आहेत; मात्र बदललेले निकष अद्याप प्राप्त झालेले नाहीत. 

योजनेचे स्वतंत्र खाते 
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेपर्यंत या योजनेचे बॅंक खाते जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडे होते. प्राप्त निधिवर जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे नियंत्रण होते. त्यांच्या स्वाक्षरी शिवाय निधी खर्च होत नव्हता; पण "जल जीवन'चे खाते वित्त अधिकाऱ्यांकडून काढून घेत जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या नावे सुरू केले आहे; मात्र लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे नियंत्रण संपुष्टात आले तरी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली या विभागाचा कारभार चालेल. 

केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या नावात बदल करून "जल जीवन मिशन', असे केले आहे. योजनेचे नाव बदलताना निकषही बदलले आहेत. ग्रामीण पेयजलमध्ये गाव, वाडी धरून योजना राबविली जात होती. जल जीवन मिशनमध्ये प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळाले पाहिजे, यासाठी सर्व्हे झाला. त्यानुसार सिंधुदुर्गला एक लाख 18 हजार 507 नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. 
- श्रीपाद पाताडे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com