‘जलस्वराज्य-२’च्या पूर्वतयारीची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

महाड - रायगड जिल्ह्यात जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्यातून ‘जलस्वराज्य-२’ हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्याअंतर्गत कामे होणार असलेल्या गावांची जागतिक बॅंकेच्या प्रतिनिधी स्वाती डोग्रा यांनी नुकतीच पाहणी केली.

महाड - रायगड जिल्ह्यात जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्यातून ‘जलस्वराज्य-२’ हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्याअंतर्गत कामे होणार असलेल्या गावांची जागतिक बॅंकेच्या प्रतिनिधी स्वाती डोग्रा यांनी नुकतीच पाहणी केली.

त्यांनी पोलादपूर तालुक्‍यातील वाकण-मुरावाडी या टंचाईग्रस्त वाडीला भेट दिली. वारकरी परंपरेचा वारसा असलेल्या या वाडीने टाळ, मृदुंगाच्या गजरात त्यांचे स्वागत केले. या वाडीसाठी १३ लाख १९ हजारांची पाऊसपाणी संकलन योजना मंजूर करण्यात आली आहे. पूर्वतयारीच्या पाहणीसाठी या प्रतिनिधींनी भेट दिली. ग्रामस्थ आणि महिला यांच्यासोबत चर्चा केली. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पी. एम. साळुंके, पोलादपूरचे गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, कार्यकारी अभियंता ए. ए. तोरो, भू-वैज्ञानिक गावडे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक जगन्नाथ साळुंके, सरपंच हिराबाई सालेकर व सदस्य उपस्थित होते.

जलस्वराज्य-२ कार्यक्रमात रायगड जिल्हा परिषदेबरोबर काम करीत असलेल्या ‘सहाय्यकारी सेवा संस्थे’ने ग्रामपंचायतीच्या मदतीने हा कार्यक्रम यशस्वी केला. जनजागृती, फिल्म शो, गृहभेटी, कुटुंब सर्वेक्षण, विविध समितींची स्थापना, ग्रामीण सहभागीय मूल्यावलोकन, गाव बैठक, महिलासभा, ग्रामसभा, जलजागृती सप्ताह आदी उपक्रम राबविण्यात आले. संस्थेचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक जगन्नाथ साळुंके, दिनेश मुसळे यांनी गावकऱ्यांना योजनेची माहिती दिली.

जागतिक बँकेच्या साह्यातून राबवल्या जात असलेल्या या योजनेमुळे रायगड जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावांतील भीषण पाणीटंचाईचा प्रश्‍न निकालात निघणार आहे. 

Web Title: jalswarajya 2 Introductory Survey