सीवर्ल्डसाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावू - जयकुमार रावल

सीवर्ल्डसाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावू - जयकुमार रावल

वैभववाडी - पर्यटन जिल्हा असूनही सिंधुदुर्ग पर्यटन विकासात मागे राहिला, हे मान्य करीत पर्यटनवृद्धींच्या अनुषंगाने दोन महिन्यांत जिल्ह्यात दोन पंचतारांकित हॉटेल आणि विमानतळ सुरू करण्यात येणार आहेत. रखडलेला सी वर्ल्ड प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्याची ग्वाही पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी येथे दिली.

वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून उभारलेल्या महाराणा प्रतापसिंह कलादालन व सांस्कृतिक केंद्राचे उद्‌घाटन महाराणा प्रतापसिंहाचे वंशज असलेले लक्ष्यराज सिंह मेवाड यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी ढोल-ताशांच्या गजरात दत्तमंदिर ते कलादालन अशी मिरवणूक काढली. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या बाजूच्या मैदानात सभा झाली. सभेला खासदार नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी दिलीप पाढंरपट्टे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, महेश जाधव, दीपा गजोबार, गणपत रावराणे, सदानंद रावराणे, संतोष जाधव, परितोष कंकाळ आदी उपस्थित होते.

पर्यटनमंत्री रावल म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग हा सर्वात सुंदर जिल्हा आहे. या जिल्ह्यात अनेक नैसर्गिक, धार्मिक अणि ऐतिहासिक पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला होता; परंतु गेल्या काही वर्षांत या जिल्ह्याचा पर्यटनाच्या माध्यमातून अपेक्षित विकास झाला नाही, हे वास्तव आहे; परंतु ही उणीव यापुढील काळात भरून काढली जाईल. येत्या दोन महिन्यांत दोन पंचतारांकित हॉटेल आणि विमानतळ सुरू करण्यात येईल.’’

ते म्हणाले, ‘‘सीवर्ल्ड प्रकल्पांच्या जमिनीबाबत काही तांत्रिक दोष आहेत. त्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठकीचे आयोजन करण्यात येईल. पर्यटनाला इतिहासाची जोड दिली तर पर्यटन अधिक चांगल्या पद्धतीने बहरेल.’’

खासदार नारायण राणे म्हणाले, ‘‘आपले पूर्वज परकीय आक्रमणे परतवून लावण्यासाठी तलवारीने लढले. आजच्या तरुणांनी  तलवारीने लढण्याची गरज राहिलेली नाही. बुद्धीला तंत्रज्ञानाची जोड देऊन देश, धर्म आणि समाजासाठी योगदान देणे आवश्‍यक आहे, तरच देश महासत्ता होईल. तरुण पिढीने इतिहास वाचण्याची गरज आहे.’’

लक्ष्यराज सिंह म्हणाले, ‘‘तरुण पिढी सोशल मीडियात गुरफटलेली असताना येथे संस्कृतीचे जतन केले जातेय, ही कौतुकास्पद बाब आहे. महाराष्ट्रात महाराणा प्रतापाचे कलादालन ही मेवाड घराण्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. हिंदुस्थानात शिवाजी आणि महाराणा हे दोनच राजे होऊन गेले. त्या दोन राजघराण्यांना एकत्र आणण्याचे काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात नीलेश राणे, दिलीप पाढंरपट्टे यांनी मनोगत व्यक्त केले.

वैभववाडीकरिता दोन कोटी निधी
पर्यटन विकासासंदर्भात महत्त्वाची बैठक उद्या (ता.७) होणार आहे. आपण वैभववाडीकरिता दोन कोटींचा निधी राखून ठेवतो. आपण तत्काळ प्रस्ताव द्या, असे आवाहन मंत्री रावल यांनी आमदार राणेंना केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com