जेटीवरील अनधिकृत अतिक्रमण हटविले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मालवणात कारवाई : राष्ट्रीय सुरक्षिततांतर्गत बंदर विभागाची मोहीम

मालवणात कारवाई : राष्ट्रीय सुरक्षिततांतर्गत बंदर विभागाची मोहीम

मालवण : येथील बंदर जेटीवरील अनधिकृत बॅनर, पोस्टर तसेच अनेक स्टॉल चार दिवसांत हटविण्यात यावेत, अशी नोटीस बंदर विभागाने स्टॉलधारक व फेरीवाल्यांना बजावली आहे. बंदर जेटीवरील लावलेले अनेक बॅनर, पोस्टर तसेच हिरवी जाळी हटविण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदर जेटीवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी सूचना सीमा शुल्क विभागाच्यावतीने बंदर विभागास केली होती. यानुसार मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन संजय वर्मा यांच्या आदेशाने येथील बंदर विभागाने ही कारवाई करण्यात आली.
येथील बंदर जेटी परिसरात महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या अखत्यारीत असलेल्या जागेत लावलेल्या हातगाड्या, फूडस्टॉल तसेच अन्य व्यावसायिकांची दुकाने तत्काळ हटविण्यात यावीत. या दुकानांमुळे पर्यटकांची मोठी वर्दळ या भागात सुरू असल्याने समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवताना अडचणी निर्माण होत असल्याचे सीमा शुल्क विभागाने स्पष्ट केले होते. यासंदर्भात सीमा शुल्क विभागाच्यावतीने वरिष्ठ बंदर अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यामुळे बंदर विभागाने स्टॉल व्यावसायिकांना नोटिसा बजावून हे स्टॉल हटविण्याच्या सूचना केल्या असून यावरील कार्यवाही न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे बंदर विभागाने स्पष्ट केले आहे. बंदर विभागाने बंदर जेटीवरील सर्व स्टॉलधारकांची बैठक घेत सीमा शुल्क विभागाच्यावतीने केलेल्या तक्रारींची माहिती दिली. बंदर जेटीवरील हातगाड्या तसेच विविध स्टॉल हटविण्याची कार्यवाही तत्काळ करण्याची सूचना केली. या वेळी स्टॉलधारकांनी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली; मात्र राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्‍न असल्याने यात बंदर विभागाने कोणताही हस्तक्षेप केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर जेटीवरील हिरव्या जाळ्या हटविण्यात आल्या.

 

Web Title: jetty unauthorized encroachment deleted