जेएसडब्ल्यू कंपनीची मुजोरी उतरवणार - प्रशांत ठाकूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

पेण - कंपनीच्या फायद्यासाठी स्थानिक शेतकरी व मच्छीमारांना देशोधडीला लावणाऱ्या जेएसडब्ल्यू स्टील कंपनीची मुजोरी उतरवणार, असा इशारा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (ता. २८) पेण येथे कंपनीविरोधातील आंदोलनावेळी दिला.

पेण - कंपनीच्या फायद्यासाठी स्थानिक शेतकरी व मच्छीमारांना देशोधडीला लावणाऱ्या जेएसडब्ल्यू स्टील कंपनीची मुजोरी उतरवणार, असा इशारा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (ता. २८) पेण येथे कंपनीविरोधातील आंदोलनावेळी दिला.

कंपनीच्या धरमतर खाडीतून होणाऱ्या कच्च्या मालाच्या वाहतुकीमुळे खाडीकिनाऱ्यालगत अलिबाग व पेण तालुक्‍यातील शेकडो मच्छीमारांचे जीवन उद्‌ध्वस्त झाले आहे. किनाऱ्यालगतची बांधबंदिस्ती फुटून हजारो एकर भातशेती नापीक झाली असतानाही कंपनी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत भाजपतर्फे आमदार ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य संजय जांभळे, तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, मच्छीमार संघटनेचे पांडुरंग म्हात्रे, धर्मा म्हात्रे, संजय पाटील, नगरसेवक राजू वारकर, महिला तालुकाध्यक्ष अंकिता पोटे यांच्यासह शेतकरी व मच्छीमार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

कंपनीने शेतकरी व मच्छीमारांचा विश्‍वासघात केला आहे. येत्या दोन महिन्यांत स्थानिकांच्या समस्या न सोडवल्यास कोणतीही नोटीस न देता कंपनीची दोन्ही प्रवेशद्वारे बंद करू, असा इशाराही या वेळी आमदार ठाकूर यांनी दिला. कंपनी प्रशासन पैशांच्या ताकदीवर सर्वांना विकत घेऊ, अशा भ्रामक कल्पनेत आहे. त्यांचा हा भ्रम भाजप दूर करील. स्थानिकांना नुकसानभरपाई दिल्याची खोटी आकडेवारी सादर करून कंपनीकडून सरकार व नागरिकांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. कंपनीचे व सरकारचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करण्याची मागणीही ठाकूर यांनी केली. जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे ए. के. सिंग यांच्याशी चर्चा करून दोन महिन्यांची मुदत कंपनी प्रशासनाला देण्यात आली आहे, असे आमदार ठाकूर यांनी आंदोलकांना सांगितले.

कंपनीमुळे होणारे प्रदूषण, मालवाहू पट्टा, खारफुटीची झालेली कत्तल याबाबत राज्य व केंद्र सरकारकडे तक्रार करणार, असे या वेळी भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

Web Title: JSW company