कडावल परिसरातील भात लावणीची कामे पूर्णत्वाकडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

नडणी, वय आडा करण्याच्या कामास प्राधान्य; निसर्गाची संमिश्र साथ, अनुकूल वातावरण

कडावल - परिसरात भात लावणीची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात काहीसे उत्साहाचे वातावरण आहे. आता पुढील कामाच्या नियोजनात शेतकरी गुंतले आहेत. नडणी तसेच वय आडा (कुंपण) करण्याच्या कामास प्राधान्यक्रम आहे.

नडणी, वय आडा करण्याच्या कामास प्राधान्य; निसर्गाची संमिश्र साथ, अनुकूल वातावरण

कडावल - परिसरात भात लावणीची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात काहीसे उत्साहाचे वातावरण आहे. आता पुढील कामाच्या नियोजनात शेतकरी गुंतले आहेत. नडणी तसेच वय आडा (कुंपण) करण्याच्या कामास प्राधान्यक्रम आहे.

यंदाच्या खरिप हंगामात शेतकऱ्यांना निसर्गांची संमिश्र साथ लाभली. वळवाचा पाऊस यंदा उशिरा पडल्यामुळे भात पेरणीची कामे थोडीशी लांबली. यामुळे भात लावणी हंगामही पुढे जाईल असा शेतकऱ्यांचा कयास होता; मात्र तरवा काढणीस प्रारंभ झाल्यानंतर शेतकऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करून हंगाम वेळेत आवरण्यासाठी प्रयत्न केले. 

पुढे निसर्गाचीही चांगली साथ मिळाल्याने शेतकऱ्यांचे काम काहीसे सुकर झाले. मध्यंतरी काही दिवस पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे शेती कामात थोडीशी अडचण निर्माण झाली; मात्र पाऊस योग्य प्रमाणात पडताच शेतकऱ्यांनी ही तुटही भरून काढली. भात लावणी हंगामात दोन वेळा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे कामात थोडा व्यत्यय निर्माण झाला; मात्र मोठी हानी झाली नाही. एकंदरीत यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना निसर्गाची संमिश्र साथ लाभली.

अनुकूल वातावरण लाभताच येथील शेतकऱ्यांनी भात लावणीसाठी दिवस रात्र एक केला. पुरूष सकाळी लवकरच जोत घेवून शेतावर जात होते. महिलाही घरातील काम आटोपून तरवा काढण्यासाठी शेतात जाण्यास धांदल करत होत्या. बहुतेक शेतकऱ्यांनी यंदा पारंपारीक जोताच्या सहाय्याने शेत नांगरणी केली; मात्र काम अधिक जलद होण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी बैलांच्या पारंपारिक जोतांबरोबरच पॉवर टीलरचाही वापर केला. ऐन हंगामात मजूरांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली.

शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण
सर्व अडथळ्यांवर मात करत हंगाम आवरता घेण्यासाठी शेतकरी झटत होते. पुढे पावसाचे प्रमाणही चांगले राहिल्यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणित झाला व कामाला अधिक गती लाभली. ज्या शेतकऱ्यांची कामगत संपली त्यांनी कामगत मागे राहिलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. नंतरच्या काळात काही प्रमाणात मजूरही उपलब्ध होवू लागले आणि शेत झपाट्याने लागवडीखाली येवू लागली. आता कडावल परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांची भात लावणी पूर्ण झाली आहे. कामगत पूर्ण झाल्यामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण असून ते सध्या काहीसे निवांतपणाचे क्षण अनुभवत आहेत. पुढील कामांचे नियोजनही करण्यात येत असून नडणी तसेच वय आडा करण्याच्या कामास प्राधान्यक्रम दिला जात आहे.

Web Title: kadaval news rice plantation work complete