धक्कादायक ! कलकामचा गुतंवणुकदारांना 35 कोटीचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

याबाबत कंपनीचे व गुंतवणूकदार संतोष भाटकर, मानाजी आयरे, नवनीत जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले, पूर्वीची कलकाम मायनिंग ऍण्ड लॉजिस्टीक्‍स प्रा. लि. या नावाने 24 डिसेंबर 2004 मध्ये स्थापन झालेली कंपनी आता कलकाम रिअर इन्फ्रा इंडिया लि. या नावाने कार्यरत आहे.

चिपळूण ( रत्नागिरी ) - दामदुपटीचे आमिष दाखवत कलकाम रिअल इन्फ्रा इंडिया लि. या कंपनीने जिल्ह्यातील 6 हजाराहून अधिक गुंतवणुकदारांना सुमारे 35 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. याबाबत पोलिसात तक्रार दिली असून अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे येथील तहसील कार्यालयासमोर 15 ऑगस्टला उपोषण करण्याचा निर्धार गुंतवणूकदार व एजंटानी केला आहे. 

याबाबत कंपनीचे व गुंतवणूकदार संतोष भाटकर, मानाजी आयरे, नवनीत जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले, पूर्वीची कलकाम मायनिंग ऍण्ड लॉजिस्टीक्‍स प्रा. लि. या नावाने 24 डिसेंबर 2004 मध्ये स्थापन झालेली कंपनी आता कलकाम रिअर इन्फ्रा इंडिया लि. या नावाने कार्यरत आहे. या कंपनीने चेअरमन विष्णू पांडुरंग दळवी (रा. ठाणे, मूळगाव घोडगेवाडी, दोडामार्ग सिंधुदुर्ग), सहकारी संचालक विजय चंद्रकांत सुपेकर व सुनील रघुनाथ वांद्रे (वसई - नालासोपारा, दोघांचे मुळगाव महाड) यांनी ही कंपनी सुरू केली आहे.

मायनिंग प्रोजेक्‍ट, कल्पार्क हॉटेल तसेच दोडामार्ग कुडाळ व सावंतवाडी येथे शेकडो एकर जमीन वाहतुकीसाठी लागणारे डंपर, स्व मालकीची कार्यालये आणि आर. ओ. सी अंतर्गत शासनाने दिलेल्या मान्यता दाखवून जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना या कंपनीने जाळ्यात ओढले. 

या कंपनीत मुदत ठेवी, आरडी स्वरूपात गुंतवणूक केली जात होती. 3 वर्षात गुंतवणुकीच्या दुपटीने मोदबला दिला जात होता. सुरवातीचे काही वर्षे परतावा येत होता. परिणामी गुंतवणकीचे प्रमाण वाढत गेले. काहींनी कर्जे काढून 10 ते 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यातून जिल्ह्याभरातील 6 हजार ग्राहकांचे 35 कोटी रुपये या कंपनीकडे गुंतवले गेले आहेत.

याबाबाबत संचालकाबरोबर वारंवार बैठका व चर्चा झाल्या आहेत. प्रत्येक वेळी थातूरमातूर उत्तरे देत वेळ मारून नेली. एवढेच नव्हे तर कंपनीने काही धनादेश दिले. मात्र ते वठलेले नाहीत. 3 मार्चला पोलिसांना स्मरणपत्रही दिले. मात्र अद्याप कोणताही कारवाई झाली नसल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. यावेळी माधवी भोसले, स्नेहा कदम आदी उपस्थित होत्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalkam India Company Cheat Investors Crime Against Company