खासदार राऊत नकोत; सुरेश प्रभूच हवेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

""खासदारांच्या कार्यपद्धतीबाबत कणकवलीतील निष्ठावंतांनी सर्वप्रथम आवाज उठवला. त्यानंतर दोडामार्ग ते चिपळूण पर्यंतच्या 14 तालुक्‍यात राऊत यांच्या विरोधात रोष व्यक्‍त झाला. आम्हाला श्री. राऊत कदापी मान्य होणार नाहीत.""

- शिशिर परुळेकर

कणकवली - मोदी लाटेमुळे निवडून आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी भाजपने आणलेल्या निधीचे श्रेय लाटले. दुसरीकडे मोदींसह भाजप सरकारची बदनामी केली. भाजप कार्यकर्त्यांकडे तर ढुंकूनही पाहिलेले नाही. असला खासदार आम्हाला उमेदवार म्हणून नको आहे. आम्हाला सुरेश प्रभू हेच उमेदवार हवे आहेत अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या संघटक राजश्री धुमाळे यांच्यासह भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनी आज केली.

येथील भाजप संपर्क कार्यालयात सौ.धुमाळे यांच्यासह भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना मांडल्या. यावेळी तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, राजन चिके, परशुराम झगडे, शिशिर परुळेकर, पप्पू पुजारे, लक्ष्मण गावडे, बबलू सावंत आदी उपस्थित होते.

सौ.धुमाळे म्हणाल्या, ""कणकवलीतील रेल्वे अंडरपास, रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण, महामार्ग चौपदरीकरण आदी कामांची उद्‌घाटने करून त्याचे श्रेय शिवसेनेचे खासदार राऊत यांनी घेतले. या कार्यक्रमांना त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना बोलावले देखील नाही. मोबाईल टॉवरसाठी निधी केंद्राने दिला; पण त्याचेही श्रेय श्री.राऊत घेत आहेत. दुसरीकडे मोदी सरकारची बदनामी देखील ते करीत आहेत.''

"खासदारांच्या कार्यपद्धतीबाबत कणकवलीतील निष्ठावंतांनी सर्वप्रथम आवाज उठवला. त्यानंतर दोडामार्ग ते चिपळूण पर्यंतच्या 14 तालुक्‍यात राऊत यांच्या विरोधात रोष व्यक्‍त झाला. आम्हाला श्री. राऊत कदापी मान्य होणार नाहीत."

- शिशिर परुळेकर

सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत पावसकर म्हणाले, ""जिल्ह्यात भाजपचे 74 सरपंच, 60 उपसरपंच आणि 900 ग्रामपंचायत सदस्य आहेत. भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायतीमधील कामांसाठी खासदारांनी निधी दिलेला नाही. त्यामुळे असा भेदभाव करणारा खासदार आम्हाला नको आहे. तशा भावना आम्ही प्रदेश कार्यकारिणीला कळविल्या आहेत.''

सी वर्ल्डचे का घालवला ?
खासदार राऊत यांना निवडून आल्यानंतर सिंधुदुर्गात एकही विकासाचा प्रकल्प आणता आला नाही. उलट असलेले प्रकल्प घालविण्याचे काम त्यांनी केले आहे. नाणार हा प्रदूषणकारी असल्याचे ते सांगतात तर सी वर्ल्डमधून कसले प्रदूषण होणार होते? हा प्रकल्प त्यांनी का घालवला. आता बेरोजगारांना ते रोजगार कसे देणार असे प्रश्‍न भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले.

...तर प्रभू मंत्री होतील
सुरेश प्रभू हे खासदार झाले तर ते पुन्हा निश्‍चितपणे केंद्रीय मंत्री होतील. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला निधी येईल; पण राऊत खासदार झाले तर ते खासदारच राहतील. त्यांचा सिंधुदुर्ग विकासाला काहीही फायदा नाही असे सौ.धुमाळे, परशुराम झगडे, शिशिर परुळेकर म्हणाले.

Web Title: Kankavali Bjp wants Suresh Prabhu as Lok Sabha candidate