कणकवली : अनामत वीज बिलांच्‍यामुळे संताप

रक्कम न भरण्याचा महावितरणला इशारा
अनामत वीज बिलांच्‍यामुळे संताप
अनामत वीज बिलांच्‍यामुळे संतापsakal

कणकवली : गेल्या काही वर्षांपासून वीज बिलामध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या हातात वीज बिलाबरोबर अनामत रक्कम भरणा करण्यासाठी बिल दिले जात असल्याने ग्राहक संतप्त आहे. त्यामुळे येत्या काळात अतिरिक्त वीज बिल ग्राहकांच्या माथी मारल्यास ते भरणार नाही, असा इशारा भाजपच्या शिष्टमंडळाने आज दिला. येथील कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते-पाटील यांच्याशी भाजपच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. अतिरिक्त अनामत वीज बिले वितरण कंपनीला परत केली आहेत.

येथील वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्याची भाजपच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली. यावेळी जिल्हा बँकेच्या संचालक प्रज्ञा डवण, पंचायत समितीचे माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप मेस्त्री, शामा दळवी, समीर प्रभुगावकर आदींच्या भाजप शिष्टमंडळाने मोहिते-पाटील यांची भेट घेतली. तालुक्यातील वीज ग्राहकांना अनामत रक्कम भरणा करण्यासाठी अतिरिक्त वीज बिले दिली आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ग्राहकांनी अनामत रक्कम भरणा केलेली असताना त्यांना अतिरिक्त बिल का दिले जाते? असा सवाल भाजपच्या शिष्टमंडळाने केला. वीज बिलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अधिभार लावले जात आहेत.

त्यातच वीज बिलाची रक्कमही वाढलेली आहे. ग्राहकांना आजच्या आर्थिक परिस्थितीमध्ये असे वीज बिल भरणा करणे शक्य नाही. त्यामुळे विज बिल अतिरिक्त देऊ नये, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे. याबाबत मोहिते-पाटील यांनी या शिष्टमंडळाला स्पष्ट करून सांगितले की, ज्यावेळी ग्राहकांनी वीज जोडण्याची मागणी केलेली असते, त्यावेळी ठराविक रक्कम अनामत रक्कम भरणा करून घेतली जाते; मात्र विजेच्या वापरानुसार ग्राहकांचे विज बिल अतिरिक्त येत असते. त्या बिलाच्या आधारावर अनामत रक्कमही वाढली जाते. वाढलेली अनामत रक्कम घेतली जाते. अनामत रकमेवर प्रत्येक ग्राहकाला वर्षाच्या एका महिन्यात अर्थात मेमध्ये अनामत रक्कमेवरील व्याज दिले जाते.

हे व्याज मूळ बिलामधून वजा करून बिल दिले जाते. त्यामुळे बिल सरासरी अतिरिक्त येत आहेत. अशा वीज ग्राहकांना हे अतिरिक्त अनामत रक्कम भरणा करावी लागते. जे ग्राहक वीज बील अनामत रक्कम भरणा करणार नाहीत. त्यांना नोटीसही पाठवली जाते; मात्र ही प्रक्रिया ज्यांची वीज बिले प्रमाणापेक्षा अधिक वापरायची असतात अशांवर ही अतिरिक्त डिपॉझिट आकारणी केली जाते.

अतिरिक्त वीज बिले परत

कणकवली तालुक्‍यातील ज्या ग्राहकांना अनामत रकमेसह अतिरिक्त वीज बिले देण्यात आली होती, अशी वीज बिले आज भाजपच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंत्यांना परत केली आहेत. ग्राहकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता वीज वितरण कंपनी जर अशा पद्धतीने वीज बिल देत असेल तर ती आम्ही भरणार नाही, असा इशारा भाजपच्या शिष्टमंडळाने दिला आहे.

वीज ग्राहकांच्या वापरानुसार दर महिन्याचे वार्षिक सरासरी अंदाजे बिल काढले जाते. ज्यांचे वीज वापराचे युनिट अधिक आहेत. अशा सरासरी वीज बिलावर अनामत रक्कम निश्चित केली जाते. त्यामुळे ही रक्कम नियमानुसार महावितरणकडे सुरक्षित ठेवली जाते. त्यावर व्याजही दिले जाते. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला त्याच्या वापरानुसार अनामत रक्कम भरणा करणे अनिवार्य आहे.

- बाळासाहेब मोहिते-पाटील, कार्यकारी अभियंता, महावितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com