कणकवलीतील फ्लायओव्हर मार्चपर्यंत पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 August 2019

पुलाची अर्धवट कामे
महामार्ग चौपदरीकरणात शहरालगतच्या जानवलीसह खारेपाटण, कसाल, बांबार्डे येथील पुलाची कामे अर्धवट राहिली आहेत. ही कामे तेथील चौपदरीकरण ठेकेदाराकडे वर्ग करण्याचे निश्‍चित झाले आहे. लवकरच याबाबतची करार प्रक्रिया होणार आहे. अर्धवट पूल बांधून पूर्ण करण्यासाठीची रक्‍कम निश्‍चित झाल्यानंतर या कामांना प्रारंभ होणार आहे.

कणकवली - शहरातील फ्लायओव्हरचे काम मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. पुरवणी निवाड्याच्या १५ प्रस्तावांना अजूनही मंजुरी मिळाली नसल्याने शहरातील चौपदरीकरणाचे काम ठिकठिकाणी रखडले आहे. याखेरीज बीएसएनएलच्या केबल जोडणी कामाची संथगती असल्याने शहरातील दीड हजारांहून अधिक लॅण्डलाईन अजूनही ठप्प आहेत.

येथील प्रांताधिकारी कार्यालयात चौपदरीकरण आढावा बैठक आज झाली. यावेळी चौपदरीकरण कामाबाबतची माहिती उपअभियंता अमोल ओटवणेकर यांनी दिली. यात शहरातील उड्डाणपुलाचे काम मार्च २०२० पर्यंत पूर्ण होईल, असे ते म्हणाले. शहरातील उड्डाणपुलासाठी ४४ पिलर उभे केले जात आहेत. त्यावर बॉक्‍स गर्डर उभे करून स्लॅब टाकले जाणार आहेत. हे काम होईपर्यंत महामार्ग दुतर्फा असलेले पत्र्याचे बॅरिकेट हटविणे शक्‍य होणार नसल्याचीही माहिती त्यांनी दिली. सध्याचा सर्व्हिस रोड सहा मीटरचा आहे.

फ्लायओव्हरचे काम पूर्ण झाल्यानंतर हा सर्व्हिस रोड आठ मीटरचा होईल. तसेच फ्लाय ओव्हरखाली पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

शहरात बाबल महाडिक, विलास कोरगावकर, सुनील कोरगावकर, चंद्रवदन कांबळी, जयेश धुमाळे यांच्यासह १५ जमीन आणि इमारत मालकांचे निवाड्यांना अजूनही मंजुरी मिळाली नाही. या प्रकल्पग्रस्तांची २१ कोटी रुपये मोबदला रक्‍कम अद्याप मंजूर झालेली नाही. या सर्वांचे प्रस्ताव केंद्राकडे पाठविले असून या प्रस्तावांना केंद्राच्या आर्थिक समितीची मान्यता मिळाली आहे. तर स्थायी समितीची मंजुरी अजूनही मिळालेली नसल्याचीही माहिती ओटवणेकर यांनी दिली. महामार्ग चौपदरीकरणात कणकवली आणि कुडाळ विभागाचा निवाडा ४७९ कोटींचा होता. यातील ४४० कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वितरण झाले आहे. पुरवणी निवाडा १८७ कोटींचा असल्याचे ते म्हणाले.

संपर्क कार्यालय अशक्‍य
जून महिन्यात झालेल्या महामार्ग चौपदरीकरण आढावा बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महामार्ग विभागाचे कणकवलीत संपर्क कार्यालय सुरू करण्याचे निर्देश दिले होते. परंतु महामार्ग विभागाकडे मनुष्यबळ नसल्याने संपर्क कार्यालय सुरू करणे शक्‍य नसल्याची माहिती उपअभियंता श्री. ओटवणेकर यांनी दिली.

‘बीएसएनएल’ची कामे संथ
शहरात नोव्हेंबर २०१८ पासून लॅण्डलाईन सेवा ठप्प झाली आहे. यात शहरातील दीड हजार दूरध्वनी अजूनही बंद आहेत. ही सेवा पूर्ववत करण्यासाठी बीएसएनएलकडून अतिशय संथगतीने काम सुरू आहे. महामार्ग दुतर्फा ठिकठिकाणी तुटलेली केबल शोधणे आणि जोडणे यात प्रचंड वेळ खर्च होत आहे. केबल शोधण्यासाठी तसेच केबल जोडण्यासाठीची आधुनिक यंत्रसामग्रीदेखील बीएसएनएलकडे नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kankavali Flyover