बीएस्सी नर्सिंग प्रवेशाबाबत संभ्रमाचे वातावरण

तुषार सावंत
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

कणकवली - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणासाठी नीट परीक्षा अनिवार्य करण्यात आली. राज्य सरकारने मात्र पॅरामेडिकल व्यवसाय अभ्यासक्रम निश्‍चित केल्याने बीएस्सी नर्सिंगसाठीच्या प्रवेशाबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. जिल्ह्यात नीटसाठी सेंटर नसल्याने नर्सिंग घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना मात्र या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नीटद्वारे पहिले कॅपराऊंड झाल्यानंतर तरी राज्य सरकार नर्सिंग घेऊ पाहणाऱ्या मुलींसाठी स्वतंत्र निर्णय घेऊन दिलासा देणार का यावर पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट ही राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा यंदा ७ मे रोजी झाली. यंदा कोकणातील विद्यार्थ्यांना कोल्हापूर केंद्रावर ही परीक्षा द्यावी लागली. परंतु उच्च माध्यमिक विभाग असलेल्या शाळामधून जनजागृती होत नसल्याने किंवा योग्य ती माहिती दिली जात नसल्याने पॅरामेडिकल क्षेत्र निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. विशेषतः बीएस्सी नर्सिंग क्षेत्राकडे वळणाऱ्या मुलींनी नीट न दिल्याने यंदाचे सामाईक प्रवेश प्रक्रियेतून मुकण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील तीन खासगी नर्सिंग महाविद्यालयामध्ये सुमारे १२० जागा बीएस्सी नर्सिंगसाठी आहेत. आता या जागांवर प्रवेश घेण्यासाठी जर नीटमधून प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर सीईटीमधून परीक्षा दिलेल्या मुलींना संधी मिळणार का किंवा बारावी सायन्स पीसीबी ग्रुपवर आधारित गुणांद्वारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार का हा खरा प्रश्‍न आहे. गेल्यावर्षी जो दिलासा मिळाला तो यंदाही मिळावा, अशी मागणी पालकवर्गातून होऊ लागली आहे. 

राज्यातील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र ही प्रक्रिया राबवित असताना राज्य शासनाकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या एकूण परिस्थितीचा विचार केला गेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानंतर राज्यात एमबीबीएस, बीडीएस व्यतिरिक्त आयुर्वेद, होमिओपॅथी, पॅरामेडिकल तसेच नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया नीटवर अवलंबून ठेवण्यात आली. मात्र याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ग्रामीण भागात कोणतीही जनजागृती करण्यात आली नाही. परिणामी यंदा नीट न दिलेल्या विद्यार्थ्यांना पॅरामेडिकल व नर्सिंगसारख्या क्षेत्राकडे वळणे अवघड झाले आहे. 

जिल्ह्यात नीटचे केंद्र हवे
वैद्यकीय क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र ती परीक्षा देण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. यापूर्वी नीटचे मुंबई हे केंद्र होते. आता मुंबई व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यामध्ये नीट परीक्षा केंद्र सुरू झाली. मात्र कोकणातील हे दोन जिल्हे वगळण्यात आल्याने मोठी गैरसोय होत आहे.

Web Title: kankavali news B.Sc Nursing