एसटीला गणेशोत्सव नियोजनाचा विसर

तुषार सावंत
बुधवार, 12 जुलै 2017

दृष्टिक्षेपात
गणेशोत्सवाचा काऊंट डाऊन सुरू
गणेशमूर्ती शाळा गजबजल्या
रेल्वे आरक्षण फुल्ल
महामार्गाची दुरवस्था
ग्रामीण रस्त्यांची चाळण

कणकवली - गणेशोत्सवाला केवळ दिड महिन्याचा कालावाधी शिल्लक असताना राज्य परिवहन महामंडळाने यंदा चाकरमान्यांच्या सेवेसाठी जादा गाड्यांचे वेळापत्रक आणि फेऱ्या अद्यापही जाहीर न केल्याने कोकणातील चाकरमाणी नाराज झाले आहेत. एकीकडे रेल्वेने कोकणातल्या प्रवाशांना तीन महिन्यापुर्वी जादा गाड्या देवून आरक्षणाची संधी दिली. तेही रेल्वे आरक्षण फुल्ल झाले आहे. मात्र एसटी महामंडळाकडून कोणतेही नियोजन झालेले नाही.  कोकणात घरोघरी गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतो. सिंधुदुर्गात दर वर्षी एसटी बसने येणाऱ्या प्रवाशांची संख्या २५ ते ३० हजार आहे. रेल्वेने ५० ते ७५ हजार प्रवाशी जिल्ह्यात दाखल होतात. याचबरोबर खाजगी गाड्यामधून हजारो प्रवाशी येतात. जिल्ह्यात ६५ हजार घरगुती गणेशमुर्ती प्रतिष्ठापणा होते. त्यामुळे बंद असलेल्या घराच्या डागडूजी आठ दिवसपुर्वीच गणेशभक्त गावाला येणार आहेत.  

तसेच २२ ते २५  ऑगस्ट या तीन दिवसाच्या  कालावधीत यंदा चाकरमनी मोठ्या संख्येने गावाकडे येणार आहेत. या प्रवाशांच्या सोईसाठी एसटी महामंडळाने गाड्यांचे नियोजन करणे अपेक्षित आहे. किंबहुना दरवर्षी किमान महिनाभर तरी अगोदर आगावू तिकीट बुकींग सुरू होते. यंदा मात्र एसटी महामंडाळाकडून फारसा प्रयत्न झालेला दिसत नाही. 

कोकणातील चाकरमानी हा गणेशउत्सवाला गावाकडे येत असताना सर्वाधिक पंसती ही रेल्वेला दिली जाते. यंदा कोकण रेल्वेने जादा फेऱ्या १८ ऑगस्टपासून १० स्पटेंबरपर्यत ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. अगदी २२ ते २५ ऑगस्टच्या कालावधीत तर प्रतिक्षा यादीचे आरक्षणही बंद झाले आहे. त्यामुळे चाकरमानी गावाकडे येणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षात एसटी बसेसकडे वळणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली असली तरी गणेशोत्सव या गर्दीच्या कालावधीत मुंबईतून जवळपास साडेतीनशे बसगाड्या सोडल्या जातात. मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे आणि पालघरमधून एसटीच्या जादा गाड्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील गावात थेटपणे सोडल्या जातात. यामुळे चाकरमानी गर्दीच्या कालावधीत एसटी बसला प्राधान्य देत असतो. ज्यांना रेल्वेचे कन्फम तिकीट मिळालेले नाही असे कुटुंबासह येणारे चाकरमानी एसटीला प्राधान्य देतात. परंतु पर्यायच उपलब्ध नसल्याने हा प्रवाशी खाजगी बसगाड्यांकडे वळला आहे. 

जिल्ह्यात येण्यासाठी मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाला पुणे ते कोल्हापूर असा पर्यायी मार्ग अलीकडच्या वर्षात निवडला जात आहे. याचे कारण महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे मुंबई-गोवा रस्त्याची दुरूस्ती झालेली नाही. परिणामी महामार्ग धोकादायक बनला आहे. गतवर्षी तर महामार्गाच्या दुरूस्तीच्या मागणीसाठी राजकीय आंदोलने झाली होती. यंदा ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था आहे.

रेल्वेची पश्‍चिम उपनगरातून हवी
कोकण रेल्वे मार्गावर मध्यरेल्वेने तसेच दक्षिण रेल्वेने काही जादा गाड्या सुरू केल्या आहेत. गणेशोत्सवात मुंबईच्या पश्‍चिम उपनगरातून जादा गाडी सोडावी अशी मागणी प्रवाशामधून होवू लागली आहे.  

श्रावण मासात आनंदोत्सव 
गणेशोत्सवापूर्वी श्रावण मासातील विविध धार्मिक सण येत असल्याने बाजारपेठेत आनंदोत्सव असेल अशी अपेक्षा आहे. नोटाबंदीमुळे मंदीचे सावट त्यानंतर आलेली जीएसटी यामुळे ग्राहक आणि विक्रेत्यामध्ये फारसा उत्साह नाही. त्यामुळे येत्या काळात श्रावण मासातील रक्षाबंधन, गोपाळकाला आणि गणेशोत्सव येत असल्याने बाजारपेठेत पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. यातून उलाढालही वाढेल या आशेवर व्यावसायिकही आहेत. 

Web Title: kankavali news st bus ganeshotsav