कणकवली : महावितरणविरुद्ध साकेडीकर आक्रमक

कणकवलीत कार्यकारी अभियंत्यांना घेराओ; दोषींना नोटीस बजावण्याची ग्वाही
महावितरणविरुद्ध साकेडीकर आक्रमक
महावितरणविरुद्ध साकेडीकर आक्रमक sakal

कणकवली : साकेडी गावातील वीज खंडित होण्याची समस्या दूर होत नसल्‍याने अखेर ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्‍यांना घेराओ घातला. यावेळी झालेल्‍या चर्चेनंतर निर्देश देऊनही साकेडी गावातील कामे न करणाऱ्या उपकार्यकारी अभियंत्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्‍याची ग्‍वाही महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिली. तसेच साकेडी गावातील ट्री कटिंगची कामे दोन दिवसांत पूर्ण करण्याची ग्‍वाही दिली.

तालुक्‍यातील साकेडी गावात मेपासूनच वीज खंडित होण्याची समस्या निर्माण होत आहे. त्‍यामुळे एक महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयाला घेराओ घातला होता. त्‍यानंतर जूनच्या पहिल्‍या आठवड्यात उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांनी साकेडी गावाचा सर्व्हे केला. तसेच सहाय्यक अभियंता श्रीराम राणे यांना साकेडी गावात ज्‍या ठिकाणी झाडाच्या फांद्या तोडण्याची आवश्‍यकता आहे, त्‍या जागांचे फोटो पाठवून वीज वाहिन्यांवरील आलेल्‍या फांद्या तोडण्याचे निर्देश दिले होते; मात्र २० जून उजाडला तरीही कोणतीही कार्यवाही झाली नाही. पावसाळा सुरू झाल्‍याने वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू राहिले आहेत. त्‍यामुळे संतप्त झालेल्‍या साकेडी ग्रामस्थांनी आज महावितरणचे कार्यकारी अभियंता मोहिते यांना घेराओ घातला.

यावेळी श्री. मोहिते यांच्याशी झालेल्‍या चर्चेत सोसायटी संचालक राजू सदवडेकर, अजित शिरसाट, रवींद्र कोरगावकर, ग्रामसेवक संजय तांबे उपस्थित होते. यावेळी आश्वासन दिलात, मग कामे का मार्गी लागली नाहीत? असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी श्री. मोहिते यांनी श्री. बगडे यांना वारंवार सूचना दिल्या; मात्र काम झाले नाही त्याची माहिती घेतो. तसेच श्री. बगडे यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावा अशा सूचना श्री.मोहिते यांनी अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता गिरीश भगत यांना दिल्या. यावेळी ग्रामस्थांनी आम्हाला कारणे नको, कोणत्याही परिस्थितीत तातडीने काम मार्गी लागले पाहिजे. गावात गणेश चतुर्थीच्या काळात देखील वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. गावात दोन गणेश चित्र शाळा असून, गणेश चतुर्थीच्या तोंडावर विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने मूर्तिकारांनाही त्रास सहन करावा लागतो. अनेकदा नळ योजना बंद राहतात.

गावची बोअरवेल बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ट्री कटिंगची कामे कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर श्री. मोहिते यांनी मालवणहुन एका ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांची टीम दोन दिवसांत साकेडीमध्ये पाठवून युद्धपातळीवर काम मार्गी लावले जाईल, असे आश्वासन दिले. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात कर्मचाऱ्यांमार्फत कामे केली जातील, असे आश्वासन देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com