सुर्याभोवती वर्तुळाकार कक्षा पूर्ण करणारा निओवाईस धुमकेतू रत्नागिरीत दिसला : बीएस्सीचे शिक्षण घेणार्‍या कपिलने टिपली छायाचित्रे..

मकरंद पटवर्धन
Thursday, 23 July 2020

निओवाईस धुमकेतूची कपिलने टिपली स्पष्ट, सुंदर छायाचित्रे..

रत्नागिरी :  कमी झालेला पाऊस आणि निरभ्र आकाशामुळे रत्नागिरीतील खगोलप्रेमी सध्या दररोज सूर्यास्तानंतर निओवाईस धुमकेतू पाहत आहेत. खास चष्मा, दुर्बिणीतून पाहता येणार्‍या या धुमकेतूची महाराष्ट्रातून सर्वांत स्पष्ट व सुंदर छायाचित्रे तालुक्यातील नेवरे येथील कपिल विनय केळकर या कॉलेज तरुणाने टिपली आहेत. खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी सर्वोत्कृष्ट छायाचित्र म्हणून त्याला सोशल मीडियावर गौरवले आहे.

हेही वाचा- गुगल अ‍ॅपवर नोंद :  चिपळूण पालिकेचे पथक पोहचले 9 हजार 470 लोकापर्यंत.. -

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात बीएस्सीचे शिक्षण घेणार्‍या कपिलने काल ( 22) रात्री ही छायाचित्रे टिपली. महाविद्यालयात खगोल विश्‍वाच्या सहकार्याने सुरू असलेल्या खगोल मंडळाचा तो कार्यकर्ता आहे. कपिलने ‘सकाळ’ला सांगितले, काल रात्री 9 नंतर धुमकेतू पाहायला गेलो. सव्वानऊ वाजता दिसला. नुसत्या डोळ्यांनी तो पुसटसा दिसतो. आता हळुहळू तो फिक्का होत जाणार आहे. निकॉन डी 5200 या कॅमेर्‍याने अ‍ॅपार्चर 3.8, शटर स्पीड 30 सेकंद, आयएसओ 1250 ठेवून हा धुमकेतू टिपला. इयत्ता अकरावीनंतर खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांच्या कार्यशाळेमुळे मला खगोलशास्त्राची आवड निर्माण झाली.

हेही वाचा- सुस्कारा : आ वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह..कोणाचे वाचा- -

असा टिपचा येतो निओवाईज धूमकेतू
रत्नागिरीतील लेन्स आर्ट ग्रुपचे फोटोग्राफर्सही या धुमकेतूची छायाचित्रे टिपत आहेत. सुर्याभोवती 6800 वर्षांची दीर्घ वर्तुळाकार कक्षा पूर्ण करणारा निओवाईज धूमकेतू पुन्हा पृथ्वीभोवतीच्या अवकाशात दिसू लागला आहे. 14 जुलैपासून 4 ऑगस्टपर्यंत 20 दिवस हा धूमकेतू साध्या डोळ्यांनी पाहण्याची अनोखी संधी लाभली आहे. सूर्यमालेचे घटक असणारे धूमकेतू वैशिष्ट्यपूर्ण असतात. यापूर्वी हेल-बॉप, मॅकनॉट असे धूमकेतू पृथ्वीवरून दिसले होते. आता निओवाईज धूमकेतू चर्चेचा विषय ठरला आहे.

कॅमेर्‍यातून पाहा धुमकेतू

उघड्या डोळ्यांनी धुमकेतू दिसला नाही तर डीएसएलआर कॅमेर्‍यातून दिसू शकतो. सूर्यास्तानंतर साधारण अर्ध्या तासाने वायव्य दिशेला दिशेला म्हणजे उत्तर-पश्‍चिम क्षितीजावर फ्रेम सेट करून कॅमेर्‍यातून लाँग एक्स्पोजर देऊन फोटो टिपता येईल, असे आवाहन मयुरेश प्रभुणे यांनी केले आहे.

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kapil snapped beautiful photographs Neovis comet in ratnagiri