धबधब्यांवर सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

कर्जत - तालुक्‍यातील अनेक ठिकाणे वीकेंड डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध आहेत. मुंबई तसेच इतर ठिकाणांहून पावसाळी सहलीसाठी पर्यटकांच्या झुंडीच्या झुंडी आषाणे-कोषाणे धबधब्यावर येतात. या शनिवार-रविवारीही या धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी झाली होती; परंतु त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येथे कुठेही पोलिस-प्रशासन यंत्रणा दिसून येत नव्हती. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

मागील वर्षी सोलनपाडा, तसेच आषाणे-कोषाणे धबधब्यांवर काही मद्यपी आणि अतिउत्साही पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे या धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना बंदी करण्यात आली होती. आता ती हटविण्यात आल्याने पुन्हा एकदा पर्यटक मनसोक्त आनंद घेण्यासाठी या धबधब्यांवर गर्दी करत आहेत. त्यात आबालवृद्धांचा समावेश असतो. अद्याप प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही व्यवस्था केलेली दिसून येत नाही. धबधब्यावर उसळणाऱ्या तुफान गर्दीमध्ये काही अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

पावसाळी सहलीसाठी येणारे पर्यटक मद्यपान करून दारूच्या रिकाम्या बाटल्या तेथेच टाकून देत असल्याने त्यांचा खच पडलेला दिसून येत आहे. काही समाजकंटक याच बाटल्या येथील खडकांवर फोडत असल्याने सर्व ठिकाणी काचा पसरल्या आहेत. यामुळे पर्यटकांना इजा होण्याची शक्‍यता आहे. याची दखल घेऊन एन्व्हायर्मेंट लाईफ (पनवेल) आणि नेरळ महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलली आहेत. 

एन्व्हायर्मेंट लाईफ संस्थेने अध्यक्ष बारई यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण-तरुणी आणि ज्येष्ठ पर्यावरणप्रेमींनी येथील दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि कचरा उचलण्याचे काम दिवसभर केले. नेरळ विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी त्यांना मदत व तेथील साफसफाई केली. हे काम स्वागतार्ह असले तरी, अन्य दिवशी पर्यटकांवर नजर ठेवण्याचे; तसेच साफसफाईचे काम कोण करणार, असा प्रश्‍न शिल्लक राहतोच.  

आषाणे-कोषाणे येथे वनखात्याच्या प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात. मुंबई व अन्य शहरांतून महिला पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात. धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेतल्यानंतर कपडे बदलण्याची येथे योग्य सोय नसल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. 
- जालिंदर नालकूल, पोलिस उपविभागीय अधिकारी, कर्जत

Web Title: karjat news waterfalls Security