गोव्यातून बेकायदा दारू वाहतुकीचे ‘कर्नाटक कनेक्‍शन‘

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

सावंतवाडी - गोव्यातून बेकायदा दारू वाहतुकीचे ‘कर्नाटक कनेक्‍शन‘ अधिक घट्ट झाले आहे. यामुळे सिंधुदुर्गमार्गे होणारी दारूतस्करी थोडी कमी झाली असली तरी अजूनही कोट्यवधींचा माल गोव्याची सीमा ओलांडून महाराष्ट्रात पोचत आहे.

सावंतवाडी - गोव्यातून बेकायदा दारू वाहतुकीचे ‘कर्नाटक कनेक्‍शन‘ अधिक घट्ट झाले आहे. यामुळे सिंधुदुर्गमार्गे होणारी दारूतस्करी थोडी कमी झाली असली तरी अजूनही कोट्यवधींचा माल गोव्याची सीमा ओलांडून महाराष्ट्रात पोचत आहे.

गोव्यातून आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्रासह इतर भागांत मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी चालते. यात एकाचवेळी कंटेनर, मोठ्या गाड्यांचा वापर करीत लाखो रुपयांची दारू कर चुकवून नेली जाते. गोव्यात अशा दारू बनविणाऱ्या उद्योगाची उलाढाल खूप मोठी आहे. यात बनावट दारू बनविण्याचे प्रमाण जास्त आहे. 

साधारण चार वर्षांपूर्वी ही सर्व दारू महाराष्ट्रातून इतर भागात पोचविली जात असे. यात कोट्यवधींची हप्तेखोरी होती. विविध तपासी यंत्रणांना यात बांधलेले होते. अशी दारू महामार्गावर पोचेपर्यंत त्यांची विविध ठिकाणी तपासणी होते. गोव्यातून हा माल बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र किंवा कर्नाटक असे दोन पर्याय आहेत. पूर्वी कर्नाटकात दारू पकडण्यासाठीची यंत्रणा कडक होती. त्यामुळे महाराष्ट्रातील हप्तेखोरी तेजीत होती. 

चार वर्षांत मोठ्या प्रमाणात होणारी दारू वाहतूक महाराष्ट्राऐवजी चोरला घाटमार्गे कर्नाटकाकडे वळली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास ७५ टक्‍के दारूतस्करी आता कर्नाटकमार्गे होते. त्यांच्या म्हणण्यानुसार यात तस्करीचे मुख्य सूत्रधार बंगळूर परिसरातील आहेत. 

पूर्वीचे कर्नाटकातील सरकार त्यांच्यासाठी फारसे पोषक नव्हते. मात्र, अलीकडे तेथे बदललेले सत्तास्थान, त्यात असलेली या सूत्रधारांची पाळेमुळे यामुळे चोरलामार्गे दारू वाहतूक सोपी झाली आहे. याशिवाय, महाराष्ट्रातून दारू वाहतुकीसाठी वाढलेली हप्तेखोरीही याला कारण ठरली आहे. ही दारू चोरलामार्गे आंध्र प्रदेश, तमिळनाडूसह पुणे-बंगळूर महामार्गावरून महाराष्ट्रातही पोचत आहे. 

असे असले तरी सिंधुदुर्गमार्गे होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीचा ओघ अजूनही कोट्यवधींच्याच प्रमाणात आहे. मोठ्या वाहतुकीपेक्षा पश्‍चिम महाराष्ट्रापासून रायगडपर्यंत होणाऱ्या छोट्या प्रमाणातील दारू वाहतुकीचे प्रमाण कायम आहे. 

गोव्यात फास आवळण्याची गरज
गोव्यात अलीकडे बेकायदा दारू बनविणाऱ्यांविरोधात तेथील सुरक्षा यंत्रणांनी मोहीम राबवायला सुरवात केली आहे. अलीकडेच अशा गोदामांवर छापे टाकण्यात आले. मात्र, याचे प्रमाण कमी आहे. गोव्यातच अशा प्रकारांना आळा बसल्यास बेकायदा तस्करी नियंत्रणात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka Connection for illegal liquor traffic from Goa