...अशी मुसळधार कोसळली की बाजारपेठेत साचते तळे

विनोद दळवी 
Monday, 20 July 2020

आजूबाजूच्या परिसरातील सर्व पाणी तसेच भातशेतीतील पाणी हे सर्व कसाल बाजारपेठेत येत आहे. पाणी जाण्यासाठी पुरेसा मार्गच नसल्याने ही समस्या बनली आहे. 

ओरोस (सिंधुदुर्ग) - गेले अनेक दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे कसाल बाजारपेठेत पाणी वारंवार शिरत आहे. परिणामी बाजारपेठसह कसाल बसस्थानक परिसरात पाणी साचत आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाची येथील उंची वाढविल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे येथे पाणी साठुन राहत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करीत आहेत. आज मुसळधार पडलेल्या पावसाने येथे पुन्हा पाणी साचून राहिले होते. 

संपूर्ण जिल्ह्यात संततधार पावसाने दोन तिन दिवस झोडपून काढले. असून पावसाने पुन्हा जोर धरल्याने नदी-नाले, वाहळांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज पावसाने सकाळीच हजेरी लावली. कसाल परिसरात, बाजारपेठेत पाणी साचल्याने व्यापाऱ्यांच्या दुकानांत पाणी शिरले होते. मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरणाचे काम चालू झाल्यावर कसाल ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामस्थ व पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीच्या ठेकेदाराला मोरीचे बांधकामाची उंची वाढविण्यासाठी अनेक वेळा मागणी केली. या मोरीवर चार-चार पाईप टाकण्याच्या सुचनाही केल्या.

काम ही बंद पाडले होते; मात्र याकडे महामार्गाच्या ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यामुळे पूर्ण पाणी कसाल बाजारपेठेत साचत पाणी येथील व्यापाऱ्यांच्या दुकानात जात असून दुकानदारांना या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दुकानाच्या मागील बाजूस पाणी साचल्याने याचे तलावात रुपांतर पाहायला मिळत आहे. कसाल-मालवण मार्गावर असलेल्या या बाजारपेठेतील पुलाची उंचीही कमी आहे. त्यामुळे या ठिकाणच्या पुलांची उंची वाढविण्याची मागणी ग्रामस्थ अनेक दिवस करत आहे. आजूबाजूच्या परिसरातील सर्व पाणी तसेच भातशेतीतील पाणी हे सर्व कसाल बाजारपेठेत येत आहे. पाणी जाण्यासाठी पुरेसा मार्गच नसल्याने ही समस्या बनली आहे. 

रोजचेच दुखने 
महामार्गाची उंची वाढविली; पण तेथे घातलेल्या मोरीची उंची वाढविली नाही. यावरती कहर म्हणजे येथे घातलेले पाईप पाण्याच्या तुलनेत कमी पडत आहेत. याबाबत मागणी करूनही महामार्ग ठेकेदार किंवा महामार्ग प्राधिकरण लक्ष देत नाही. परिणामी पाऊस आला, की पाणी साचते. ते पाणी बाजरपेठेतील दुकाने व नजिकच्या घरांत शिरते. हा नियमितचा प्रकार झाला असून हे रोजचे दुखने बनले आहे. 

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kasal market full off water because heavy rain