प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी खुल्या ठेवा - एकनाथ आंबोकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

डॉ. रघुनाथ माशेलकर विज्ञान नगरी, गुहागर - शाळांमधील प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी कायम खुल्या असाव्यात. तिथे होणाऱ्या प्रयोगांचे शास्त्रीय आणि व्यावहारिक महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पटवून द्यावे. विज्ञान कथांचे भांडार शाळांच्या ग्रंथालयात असावे. विज्ञान प्रदर्शन, विज्ञान साहित्य यातूनच वैज्ञानिकांची पिढी तयार होऊ शकते, असे मत शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केले. 

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमधील डॉ. रघुनाथ माशेलकर विज्ञान नगरीत आज जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. सकाळी विज्ञान दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. नगराध्यक्षा स्नेहा वरंडे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. मानवाने निर्माण केलेल्या विज्ञानाने अवकाश, आरोग्य, शिक्षण, उद्योग, कृषी अशी सर्व क्षेत्रे व्यापली आहेत. विज्ञानाचा उपयोग मानवासह निसर्गसृष्टीची हानी करण्यासाठी केला जात आहे. विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग पृथ्वीच्या रक्षणासाठी करू, असा निश्‍चिय सर्वांनी करू या, असे आवाहन सौ. वरंडे यांनी केले. 

एकनाथ आंबोकर म्हणाले की, ‘‘विज्ञानप्रेमी नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन परीक्षकांनी वस्तुनिष्ठ व गुणात्मक परीक्षण विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतींना प्रोत्साहन द्यावे. विज्ञान प्रदर्शन ही वैज्ञानिक बनविणारी कार्यशाळा आहे.’’ या वेळी गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संदीप भोसले, संचालक डॉ. अनिल जोशी, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, शिक्षण विस्तार अधिकारी संदेश कडव, जि.प. सहाय्यक कार्यकारी अधिकारी राजेंद्र कांबळे, गटशिक्षणाधिकारी बी. एम. किल्लेदार, सुनील पाटील आदी उपस्थित होते. 

स्पर्धा परीक्षेतही हुशारी दिसावी - लोहार
कोकण बोर्डाची स्थापना झाल्यापासून दहावीच्या परीक्षेत कोकणातील विद्यार्थी राज्यस्तरावर झळकू लागले आहेत. परंतु स्पर्धा परीक्षा, संशोधन, विज्ञान स्पर्धा यामधून ही बुद्धिमत्ता पुढे दिसून येत नाही, अशी खंत विज्ञान प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाप्रसंगी किरण लोहार यांनी व्यक्त केली.

Web Title: Keep an open laboratory for students