खरीप हंगाम दहा दिवसांनी लांबला

खरीप हंगाम दहा दिवसांनी लांबला

रत्नागिरी - ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणातील मोसमी पावसाचे आगमनच लांबले. परिणामी दहा दिवसांनी पेरण्या लांबल्या. पावसात सातत्य राहिले तर लावण्या वेळेत पूर्ण होतील, अन्यथा पुन्हा बळीराजाची चिंता वाढणार आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात निर्माण झालेली अशी परिस्थिती पाच वर्षांनी उद्‌भवली आहे. २०१४ ला पंधरवड्यात १०२ सरासरी नोंद झाली होती. यावर्षी सरासरी पाऊस ११७ मिमी झाला आहे.

रोहिणी नक्षत्र सुरू झाल्यानंतर पूर्वमोसमी पाऊस पडतो; परंतु यावर्षी जून महिन्याचा पहिला आठवडा संपला तरीही पावसाची लक्षणे नव्हती. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला होता. संगमेश्‍वर, चिपळूणमधील काही शेतकऱ्यांनी धोका पत्करत धूळ पेरण्या केल्या. ८ ते १० जून च्या दरम्यान पूर्वमोसमी पाऊस झाला; परंतु त्याचा जोर नव्हता. ‘वायू’ चक्रीवादळाने पावसाचे गणित बिघडवले. जिल्ह्यातील शेतीची कामे जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतात. नांगरणी करून पेरे होतात, बेर करुन शेतात उकळणीच्या कामांना आरंभ होतो. मोसमी पावसाची चिन्हेच नसल्यामुळे पेरणीच्या कामांना दहा दिवस उशीर झाला. त्यानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतली. अधूनमधून कुठेतरी एखादी सर कोसळून जाते. पुन्हा कडकडीत उन पडते. या वातावरणाचा परिणाम कातळावरील शेतीवर होऊ शकतो.

यंदा जिल्ह्यात १ ते १६ जूनपर्यंत सरासरी ११७ मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच कालावधीत ४५९ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे गतवर्षी पेरण्यांची कामे वेळेत पूर्ण झाली आणि लावण्याही व्यवस्थित पार पडल्या. यंदा दहा दिवस उशिरा सुरू झाल्यामुळे भात लावण्यांची कामेही जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहतील असा अंदाज आहे. हवामान विभागाने यंदा पाऊस अनियमित राहील, अशी शक्‍यता वर्तविली आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भातपिकाला अनियमित पावसाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात एखाददुसरी सर पडली. लांबलेला मोसमी पाऊस आणि अनियमित स्थिती बळीराजाची चिंता वाढवणारी आहे.
 
काही ठिकाणी पेरलेली भांत उगवायला लागली आहेत. गतवर्षी २ जूनला पाऊस सुरू झाला. पेरण्यांसाठी पंधरा दिवस, तर भात लावणींसाठी तीन आठवडे लागतात. उशिराने पेरण्या झाल्या तरीही ग्रामीण भागात थांबून थांबून पाऊस पडतोय. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होईल असे नाही.
- शिवाजी जगताप,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

मागील पाच वर्षांतील १ ते १६ जूनपर्यंतची सरासरी
वर्ष    पाऊस (मिलिमीटर) 
२०१९    ११७.००
२०१८    ४१६.२८
२०१७    ३३२.६१
२०१६    १९१.२४
२०१५    १५९.८५
२०१४    १०२.३६
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com