खोपोलीत अनधिकृत बांधकामावरून वाद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

खोपोली  - खोपोली नगरपालिका हद्दीत मोकळ्या जागा व नगरपालिका गार्डन प्लॉटमध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. काटरंग परिसरात वसंत देशमुख मेमोरियल स्कूल व त्याला लागून असलेल्या रहिवासी सोसायट्यांमध्ये अनधिकृत बांधकामांचा वाद उपोषणापर्यंत पोहोचला आहे. यासंबंधी दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात कारवाई करण्यासाठी नगरपालिकेला लेखी तक्रार दिली आहे. त्यातूनच येथील रहिवाशांनी आरक्षित रस्त्याच्या जागेत झालेल्या बांधकामांविरोधात येत्या 26 तारखेपासून साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे. 

खोपोली नगरपालिका हद्दीत मोजे काटरंग येथे वॉर्ड क्रमांक 11मधील प्लॉट 1 ते 13 करिता आशियाना व्हिलेज रहिवासी इमारतीला लागून येथील मुलांना खेळण्यासाठी राखीव भूखंड ठेवण्यात आला आहे. तसेच इमारत प्लॉट 4 ते 8 करिता याच प्लॉटला लागून वीस फुटी रस्ता रहदारीसाठी ठेवण्यात आला आहे; मात्र येथील रहिवासी पद्माकर आहेर यांनी रस्त्याच्या भागात बंगल्याची संरक्षक भिंत बांधली आहे; तर दुसऱ्या बाजूने वसंत देशमुख शाळेनेही रस्त्यात आपली संरक्षक भिंत बांधून रस्ता तीन फुटांवर आणून ठेवला आहे. 

तसेच नगरपालिका राखीव भूखंडाला लागून असलेली जागा शाळेने विकत घेतली आहे. त्याला लागून असलेली राखीव जागा शाळेतील मुलांना खेळण्यासाठी मिळावी, अशी विनंती शाळा व्यवस्थापनाने नगरपालिकेला केली व आम्ही सदर जागा स्वखर्चाने विकसित करू, असे सांगितले. त्यानुसार नगरपालिकेने शाळेची विनंती स्वीकारून सदर राखीव जागेमध्ये वसंत देशमुख शाळेला गार्डन विकासासाठी परवानगी दिली व वादाला सुरुवात झाली आहे. 

दोन्ही पक्ष आम्ही रस्त्याच्या जागेत बांधकाम केल्याचे मान्य करतात. पण आधी अतिक्रमण केलेल्यांवर नगरपालिकेने कारवाई करावी, असा आग्रह धरत आहेत. यात येथील इतर रहिवाशांची गैरसोय होत असल्याने त्यांनी येत्या 26 जानेवारीपासून साखळी उपोषणाचा इशारा नगरपालिकेला दिला आहे. 

रहिवाशांची तक्रार नगरपालिकेला मिळाली आहे. याबाबत चौकशी करून संबंधितांना नगरपालिका लवकरच नोटीस बजावणार आहे. रस्त्याच्या जागेत केलेले बांधकाम दोन्ही पक्षांकडून हटवण्याचे आदेश आम्ही देणार आहोत. 
- डॉ. दीपक सावंत, मुख्याधिकारी, खोपोली नगरपालिका. 

आम्ही शाळानिर्मिती करण्यापूर्वी पद्माकर आहेर यांनी रस्ता व राखीव जागेत अतिरिक्त बांधकाम केलेले आहे. आम्ही तेव्हापासून अतिक्रमित बांधकाम हटवण्यासाठी मागणी करीत आहोत. मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. शाळेची भिंत रस्त्यात असेल तर आम्ही आमच्या खर्चाने ती हटवण्यास तयार आहोत. मात्र वर्षानुवर्षे मोकळी पडलेली जागा शाळेतील मुलांना खेळण्यास उपयोगी यावी यासाठी आम्ही सदर जागा विकसित करण्यासाठी नगरपालिकेकडे परवानगी मागितली आहे. त्याचा रस्त्यावरील अतिक्रमणाशी कोणताही संबंध नाही; मात्र काही जण उगाच याला वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीही नगरपालिकेने नियमाप्रमाणे केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करू व त्याची अंमलबजावणी करू. 
- उल्हासराव देशमुख, संस्थापक अध्यक्ष, वसंत देशमुख मेमोरियल स्कूल.

Web Title: Khopoli argument from the unauthorized construction