काळ आला होता, पण वेळ आली नव्हती : मासेमारी करणे बेतले असते जीवावर 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 February 2021

चोहोबाजूला पाणी पाहिल्यानंतर तो घाबरला होता. दगडाचा आधार घेऊन तो आतमध्येच अडकून पडला.

रत्नागिरी : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा अनुभव कराड येथून रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या तरुणांना आला. शहराजवळील भगवती बंदर येथे पर्यटनासाठी आलेले तरुण मासेमारीसाठी समुद्रातील खडकावर गेले. भरतीचे पाणी वाढल्यामुळे किनाऱ्यावर परतताना त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांच्या मदतीने अखेर तो तरुण किनाऱ्यावर परतण्यात यशस्वी झाला. 

रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास एक तरुण कराडहून रत्नागिरीत फिरण्यासाठी आला होता. त्याच्या रत्नागिरीतील मित्रासोबत तो भगवती बंदर येथे मासेमारीसाठी गेला. सकाळी ओहोटी असल्यामुळे पाणी कमी होते. त्यामुळे त्यांना समुद्रकिनाऱ्यावरुन थोडं पाण्यातील भागात खडकांचा आधार घेत जाता आले. पौर्णिमा असल्यामुळे तासाभरातच पाणी भरायला लागले. पाणी वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर तो किनाऱ्याकडे येऊ लागला. परत येण्याच्या मार्गावरच पाणी आल्यामुळे तो तरुण खडकावरच अडकून पडला. त्यातील एकाला पोहता येत असल्यामुळे तो पाण्याबाहेर आला. पण कराडमधील तो युवक पोहता येत नसल्यामुळे तिथेच अडकून पडला. 

हेही वाचा- शेतकऱ्यांना दिलासा : कृषिपंप वीजजोडणीसाठी मोहीम; महावितरणचे कृषी ऊर्जा पर्व

भगवतीजवळील प्रकार; पोलिसांमुळे तरुण वाचला 

चोहोबाजूला पाणी पाहिल्यानंतर तो घाबरला होता. दगडाचा आधार घेऊन तो आतमध्येच अडकून पडला. किनाऱ्यावर आलेल्या त्या मित्राने इतर मित्रांना दूरध्वनीवरुन ही माहिती कळवली. त्या मित्रांनी पोलिसांना कळवल्यावर अडकून पडलेल्या मित्राला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अखेर त्या युवकाला पाण्याबाहेर काढून त्याची सुटकाही करण्यात आली. पाण्याबाहेर येताच ते दोन्ही युवक तेथून तत्काळ निघून गेले.  

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kokan dumping case Fishing is a must kokan fisher news