'आम्ही दलाल नाही तर शेतकरी आहोत, कोकणच्या विकासासाठी नाणार आवश्यकच'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 August 2020

राजन साळवी यांच्याकडे नाणार परिसरातील शेतकर्‍यांसह स्थानिक शिवसैनिकांनी निवेदनाद्वारे केली.

राजापूर : “आम्ही जमीन दलाल नसून स्थानिक शेतकरी आहोत. त्यामध्ये बहुतांश शिवसैनिक आणि पदाधिकारीही आहोत. राजापूर तालुक्यासह कोकणच्या विकासासाठी रिफायनरी प्रकल्पाची आवश्यकता आहे. रिफायनरी मागणीचा आम्हां समर्थकांचा आवाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवून या ठिकाणीच रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करावी.” अशी आग्रही मागणी आज आ. राजन साळवी यांच्याकडे नाणार परिसरातील शेतकर्‍यांसह स्थानिक शिवसैनिकांनी निवेदनाद्वारे केली.

मुख्यमंत्री ठाकरे यांना देण्यासाठी नाणार परिसरातील शेतकरी आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विलास अवसरे, विद्यमान शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर, धनंजय मराठे, मन्सूर काझी, विद्याधर राणे, राजा काजवे, फारूख साखरकर, मंगेश मांजरेकर, नगरसेविका प्रतिक्षा खडपे आदींनी आ. साळवी यांना निवेदन दिले.

 

यावेळी साळवी यांच्यासमवेत पंचायत समितीच्या सभापती विशाखा लाड, उपसभापती प्रकाश गुरव, उपतालुकाप्रमुख विश्‍वनाथ लाड, राजन कुवळेकर, शहरप्रमुख संजय पवार, युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी संतोष हातणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - ...तर राजापूरातील शेतकरी 15 ऑगस्टला करणार आमरण उपोषण 

रिफायनरी विरोधकांचा आवाज आणि मागण्या शासन आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवतात. आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहचविल्या जात नसल्याचा आरोप यापूर्वी समर्थकांकडून केला जात होता. मात्र, आज प्रकल्प समर्थकांनी निवेदनाद्वारे साळवींच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत मागण्या पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. साळवी यांनी समर्थकांचे म्हणणे ऐकून घेत मुख्यमंत्र्यांसह अन्य लोकप्रतिनिधींपर्यंत निवेदन आणि समर्थकांच्या मागण्या पोहचविण्याचे आश्‍वासन दिल्याबद्दल समर्थकांकडून धन्यवाद दिले गेले. 

जिथे जमीनमालक जमीन देण्यास तयार होतील आणि प्रकल्पाचे स्वागत केले जाईल, त्याच ठिकाणी रिफायनरी उभारण्याची शिवसेनेची भूमिका आहे. त्याप्रमाणे प्रकल्पासाठी सुमारे साडेआठ हजार एकर जागा देण्यास शेतकरी तयार असून त्याचा प्रकल्प उभारणीच्यादृष्टीने सकारात्मक विचार व्हावा अशी मागणीही या निवेदनाद्वारे केली आहे.  

हेही वाचा -  सलाम या बळीराजाला! बैलांसाठी जीव धोक्‍यात, अनोख्या नात्याचे दर्शन...

काय आहेत निवेदनात मागण्या

1)राजापूर तालुक्यात पूर्वीच्या ठिकाणी, जवळपासच्या सीमाभागात वाड्या आणि मंदीरे वगळून सुधारीत जमिनीचा रिफायनरी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना लवकरच जाहीर करावी.

2)रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे नाव द्यावे.

3)प्रकल्पाच्या माध्यमातून सामाजिक सुविधा, स्थानिकांना नोकर्‍या आणि रोजगारामध्ये सहभाग हमीची व्यवस्था निर्माण करावी.

4)प्रकल्प समर्थकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी भेट द्यावी.

हेही वाचा - चाकरमान्यांच्या दिमतीला एसटी, कितीजण आले सिंधुदुर्गात? 

“रिफायनरीबाबतचे आपले म्हणणे आणि निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे निश्‍चितच पोहचवू. त्या माध्यमातून प्रकल्प समर्थक म्हणून आपणा सर्वांची चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करू.”

-राजन साळवी, आमदार राजापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kokan nanar project sports demand to start project in kaokan