सावंतवाडी: पोलिस ठाण्याच्या जागेत पेट्रोल पंप?

अमोल टेंबकर
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

इमारत पाडण्यास विरोध-
याबाबत खासगीत बोलताना अनेक पोलिस कर्मचार्‍यांनी या प्रक्रियेला विरोध केला आहे. संस्थानकालीन इमारत असताना ही इमारत ऐतिहासीक वास्तूत घेतली गेली नाही हे दुदैव आहे. तरीही आता जुनी इमारत म्हणून त्याचे जतन होणे गरजेचे आहे. सद्यस्थिती जुनी म्हटली जाणारी इमारत सुस्थितीत आहे. त्यामुळे ती न पाडता त्याठिकाणी किमान पोलिसांसाठी रेस्टहाउस उभारण्यात यावे. 
 

सावंतवाडी : तब्बल दोन कोटी रुपये खर्च करुन येथील पोलिस ठाण्याची नवीन इमारत उभी करण्यात आल्यानंतर ऐतिहासीक असलेल्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी पेट्रोलपंप उभारण्याचा घाट गृह विभागाकडून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलिस प्रशासनाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आहे. वरिष्ठांच्या या निर्णयाबाबत कर्मचारी नाराज असून ही इमारत पाडू नये, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

येथील पोलिस ठाण्याची इमारत उद्यापासून (ता.15) मोकळा श्‍वास घेणार आहे. त्याठिकाणी असलेले कार्यालय आता नव्या जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. तब्बल दोन कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या नव्या इमारतीत हे कार्यालय जाणार आहे; परंतु जुन्या इमारतीबाबत गृह विभागाकडुन नकारात्मक विचार करण्यात आला आहे.

काही कर्मचार्‍यांनी खासगीत दिलेल्या माहीतीनुसार नव्या इमारतीच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमिवर झालेल्या आढावा बैठकीत जुनी इमारत पाडुन त्याठिकाणी पेट्रोलपंप सुरू करण्याचा मानस आहे. सद्यस्थितीत ही जागा गृहविभागाच्या ताब्यात आहे. ही जागा मुंबई गोवा महामार्गाला लागुन आहे. त्यामुळे त्याठिकाणी अनेकांचे डोळे आहेत. अशा परिस्थिती पेट्रोलपंप उभारुन ती जागा खासगी विकासकाच्या गळ्यात घालण्याचा डाव सुरू असल्याचे चित्र आहे. यात संबधित जागेवर गृहविभागाच्यावतीने पेट्रोलपंप उभारण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्याठिकाणी पोलीस ठाणे आणि कर्मचार्‍यांना लागणार्‍या पेट्रोल डिझेलसह अन्य लोकांना त्याचा फायदा देण्यात येणार आहे. या जागेबरोबर आंबोली येथे असलेली एक जागेचा विचार करण्यात आला आहे, असे सांगण्यात येत आहे.

पोलिस ठाण्याची इमारत ऐतिहासिक-
येथील पोलिस ठाण्याची सद्यस्थितीत वापरात असलेल्या इमारतीला ऐतिहासीक पार्श्‍वभूमी आहे. 5 मार्च 1899 च्या पूर्वी ही इमारत उभारण्यात आली. लोकल इन्फन्ट्री कॉप्स लाईन असा उल्लेख आहे.

तत्कालीन पोलिटिकल सुप्रिटेंडट ऑफ दी सावंतवाडी स्टेटचे  राजे बहादुर हर हायनेस रघुनाथराव सावंत भोंसले यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले होते. तत्कालीन परिस्थिती याचा वापर इंग्रजांसह सावंतवाडीच्या राजघराण्याने केला होता. सैनिकांसह घोड्याची पाग त्याठिकाणी होती. पुढे जिल्ह्याचे पोलिस मुख्यालय त्याठिकाणी होते. त्यानंतर मुख्यालय ओरोसमध्ये हलविल्यानंतर त्याठिकाणी पोलिस स्टेशन सुरू करण्यात आले.

इमारत पाडण्यास विरोध-
याबाबत खासगीत बोलताना अनेक पोलिस कर्मचार्‍यांनी या प्रक्रियेला विरोध केला आहे. संस्थानकालीन इमारत असताना ही इमारत ऐतिहासीक वास्तूत घेतली गेली नाही हे दुदैव आहे. तरीही आता जुनी इमारत म्हणून त्याचे जतन होणे गरजेचे आहे. सद्यस्थिती जुनी म्हटली जाणारी इमारत सुस्थितीत आहे. त्यामुळे ती न पाडता त्याठिकाणी किमान पोलिसांसाठी रेस्टहाउस उभारण्यात यावे. 

अंतिम काही नाही-
याबाबत पोलिस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अजून अद्याप अंतिम निर्यण नाही, असे सांगितले. त्यामुळे आपण अधिक काही सांगू शकत नाही, असे सांगुन *त्यांनी अधिक बोलणे टाळले-

आर्मेचरीचे म्युझीयची अपेक्षा-
याबाबत एक पोलिस कर्मचारी म्हणाले “त्याठिकाणी बांधण्यात आलेले आर्मेचरी हे इंग्रजांच्या काळात त्यांच्या बनावटीनुसार बांधण्यात आले आहे. त्यावर वीज रोखण्यासाठी त्यावेळी पंचधातू वापरुन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आतील बनावट सुध्दा वेगळी आहे. त्यामुळे या आर्मेचरीचे म्युझीयम म्हणून जतन होणे गरजेचे आहे.”

Web Title: Kokan news petrol pump in police station land in sawantwadi